“आमच्यासारखे लाख नेले असते तरी चाललं असतं, पण आमचा हा लाखांचा पोशिंदा तू का चोरून नेलास?”रोहित पवार यांची पोस्ट चर्चेत

0
2

दि.३०(पीसीबी)-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज बारामतीत त्यांचा ‘राख सावडण्याचा’ विधी पार पडला. ज्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर दादांना अखेरचा निरोप देण्यात आला, तिथेच त्यांची राख सावडताना त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांना अश्रू अनावर झाले. या विधीनंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या संपूर्ण महाराष्ट्राला रडवत आहे.

“जिथं बाग फुलवली, तिथंच राख सावडण्याची वेळ आली”

रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये नियतीच्या क्रूर खेळावर संताप आणि दुःख व्यक्त केले आहे. “अजितदादांनी जिथं विकासरुपी फुलांची बाग फुलवली, तिथंच त्यांची राख सावडण्याची वेळ येईल, असं कधी स्वप्नातही आलं नव्हतं,” असे म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. दादांच्या निधनाची बातमी आल्यापासून डोकं सुन्न असून मन बर्फाप्रमाणे थिजल्याची जाणीव त्यांनी करून दिली.

फणसासारखा स्वभाव आणि कामाचा दरारा अजितदादांच्या कार्यशैलीचे वर्णन करताना रोहित पवार म्हणतात:

स्पष्टवक्तेपणा: दादांचा स्वभाव फणसासारखा होता; वरून कठोर वाटले तरी आतून ते रसाळ गऱ्याप्रमाणे प्रेमळ होते.
प्रशासनावरील पकड: त्यांचं वेळेचं नियोजन, प्रशासनावरील मांड आणि राजकारणातील कमांड पाहून नेहमीच आश्चर्य वाटायचं.
दरारा आणि आदर: सत्ता असो वा नसो, त्यांचा एक वेगळाच दरारा असायचा, ज्यात भीतीपेक्षा आदर जास्त होता.
“नियतीला माझा प्रश्न आहे…”

नियतीशी तक्रार करताना रोहित पवार अत्यंत भावूक झाले. त्यांनी विचारले, “महाराष्ट्राचा गाडा हाकणारा, पहाटेपासून विकासाचा ध्यास घेणारा हा पहाडासारखा माणूस एका क्षणात कसा निघून गेला? आमच्यासारखे लाख नेले असते तरी चाललं असतं, पण आमचा हा लाखांचा पोशिंदा तू का चोरून नेलास?”

राखेतून फिनिक्सप्रमाणे उठाल असं वाटतंय…

पोस्टच्या शेवटी रोहित यांनी आपल्या मनातील आर्त इच्छा व्यक्त केली. “आज तुमची राख जमा करत असताना वाटत होतं की, फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्ही या राखेतून अचानक त्याच रुबाबात उभे राहाल आणि नेहमीच्या खर्जातल्या आवाजात म्हणाल – ‘अरे वेड्यांनो, उठा, कामाला लागा, आपल्याला महाराष्ट्रासाठी खूप काम करायचंय.’ दादा, तुम्हाला एकदा घट्ट मिठी मारायचीय… Love U दादा!”