१२ डिसेंबरलाच दोन्ही पक्ष एक होणार होते-अंकुश काकडे

0
3

महाराष्ट्राचे लाडके लोकनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी म्हणजेच २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झालं. त्यांच्यासह आणखी पाच जणांचा या अपघातात मृत्यू झाला. या घटनेने महाराष्ट्र हळहळला आहे. बारामतीकरांनी आणि महाराष्ट्राने अजित पवारांच्या पार्थिवावर झालेले अंत्यसंस्कार पाहिले. तसंच त्यांना साश्रू नयनांनी निरोप दिला. मात्र अजित पवार यांचं शरद पवारांच्या पक्षासह एकत्र येण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी याबाबत माहिती दिली. अजित पवारांनी त्यांच्याकडे काय इच्छा बोलून दाखवली होती हे त्यांनी आता सांगितलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी काय सांगितलं?

अजितदादांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरणं बदलत गेली आहेत. दोन ते अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली अजित पवारांचा पक्ष वेगळा तर शरद पवारांचा पक्ष वेगळा झाला. त्यानंतर ज्या घडामोडी झाल्या त्याला उभा महाराष्ट्र साक्षीदार होता. हे सगळं घडलं असलं तरीही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र यावं ही भावना कार्यकर्त्यांमध्ये वाढीला लागली. मी देखील कामानिमित्ताने अजितदादांना भेटलो होतो त्यावेळी मला ते म्हणायचे की आपल्याला एक व्हावं लागेल नाहीतर परिस्थिती खराब होईल. मला व्यक्तिशः त्यांनी सांगितलं होतं की अंकुशराव तुम्ही, विठ्ठलशेठ मणियार, श्रीनिवास पाटील तुमची आणि शरद पवारांची भेट होते तर तुम्ही पक्ष एक व्हावेत म्हणून प्रयत्न करायला हवेत. आम्ही आमच्या परिने प्रयत्न केला. मी शरद पवारांसह एका कार्यक्रमाला गेलो होतो तेव्हाही आम्ही हा विषय काढला होता आणि त्यांना सांगितलं होतं की अजित पवारांची इच्छा आहे की दोन्ही पक्ष एक व्हावेत. पण शरद पवारांनी यावर काही प्रतिक्रिया दिली नाही. असं अंकुश काकडेंनी टीव्ही ९ मराठीला सांगितलं.

अंकुश काकडे पुढे म्हणाले, मध्यंतरी महापालिकांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एक झाले होते. पुणे, पिंपरी चिंचवड या ठिकाणी हे दोन्ही पक्ष एकत्र आले. पुणे आणि पिंपरीत हे पक्ष एक झाले. पण हे दोन पक्ष शेवटच्या क्षणाला एकत्र आले. सुप्रिया सुळेंनी अजितदादांनी चर्चा केली. आम्हीही चर्चा करत होतो. परंतु आमच्याकडे सर्व्हेचा रिपोर्ट नव्हता. तिकिट वाटपही झालं तेव्हा काही गोष्टी घडल्या पण भाजपाला यश जास्त मिळालं. दोन्ही राष्ट्रवादींना निकालानंतर आश्चर्याचा धक्काही बसला. दादा म्हणायचे की आपण लवकरच एकत्र होणार आहोत, खरंतर १२ डिसेंबरलाच (शरद पवारांचा वाढदिवस) आपण एकत्र होणार होतो पण ती प्रक्रिया का झाली नाही, कुठे माशी शिंकली मला कळलं नाही. आता आपण एकत्र काम करु अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती. असं अंकुश काकडे यांनी म्हटलं आहे. जयंत पाटील यांनीही सांगितलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. पण ज्यांची इच्छा होती ते अजितदादाच आज नाहीत. आज अजितदादा असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. अजितदादांची दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची इच्छा आपण पूर्ण करु शकलो नाही याची खंत माझ्या मनाला आहे. भविष्यात काय होईल सांगता येणार नाही, पण नियतीला काय मान्य असतं ते सांगता येणार नाही. याबाबतीतला निर्णय आमचे वरिष्ठ घेतील असंही अंकुश काकडेंनी सांगितलं.