दि.२४(पीसीबी)-मुंबई महापौर पदासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग लावून बसलेले आहेत. मुंबईच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत नुकतीच जाहीर झाली. महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सुटले. भाजप आणि शिवसेनेकडे दोन्हींकडे उमेदवार आहेत. पण आता महापौर पदाची निवड लांबणीवर पडल्याचे समोर येत आहे. शिंदे सेनेकडून सातत्याने महापौर पदासाठी खेळी खेळली जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महापौर शिवसेनाचा व्हावा अशी मागणी रेटल्या जात आहे. तर त्याचवेळी या महिन्यात महापौर कोण होणार हे स्पष्ट होणार नसल्याचे समोर आले आहे.
मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली. तर या पदासाठी 31 जानेवारी रोजी मतदानाची प्रक्रिया होणार होती. त्यासाठी तीन दिवसांनी म्हणजे 27 जानेवारी रोजी उमेदवारांचे अर्ज दाखल होणार होते. तर महिन्याच्या अखेरच्या दिवशी महापौर पदाची निवड होणार होती. त्यासाठी जाहिरात देण्याची तयारी पण प्रशासनाने केली होती. मात्र भाजप आणि शिंदेसेनेने अद्यापही कोकण आयुक्तांकडे गटाची नोंदणी केलेली नाही. त्यामुळे महापौर निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या निवडीचा कार्यक्रमही स्थगित केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नवीन महापौरांची निवड आता फेब्रुवारी महिन्यावर लांबली आहे.
मुंबई महापालिकेतील काँग्रेसच्या 24, एमआयएमचे 8 आणि मनसेच्या 6 नगरसेवकांची कोकण भवनमध्ये नोंदणी झाली आहे. त्यांनी महापालिका सचिव कार्यालयात प्रमाणपत्र पावत्या जमा केल्या आहेत. हे नगरसेवक सचिव कार्यालयात जातीने हजर होते. दुसरीकडे उद्धव सेनेच्या 65 नगरसेवकांची नोंदणी पूर्ण झाली आहे. पण या नगरसेवकांनी त्यांच्या प्रमाणपत्राची पावती अद्याप महापालिका सचिव कार्यालयात जमा केलेल्या नाहीत. तर भाजप आणि शिंदे सेनेच्या नगरसेवकांची नोंदणी झाली नाही. प्रक्रिया पूर्ण न झाल्याने महापौर निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तोडगा निघण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या सेनेकडून महापौर पदासाठी दावा करण्यात येत असल्याचे समजते. त्यासाठी हॉटेल डिप्लोमसी झाली. तर दुसरीकडे उद्धव सेनेचे नेते सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महापौर पद सेनेचा व्हावा अशी मागणी करत आहे. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे. मित्रपक्षाला सन्मान जनक पद देत महापौर पदाचा तिढा सोडवण्याचे आव्हान भाजपसमोर आहे.







































