संभाजी बारणे यांच्याकडील शिवचरित्र संग्रह युवा पिढीला मार्गदर्शक – खासदार श्रीरंग बारणे

0
2

दि.२४(पीसीबी)- स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र सर्वांनी अभ्यासले पाहिजे. यासाठी पिंपरी चिंचवड मधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, शिवचरित्र अभ्यासक संभाजी बाळासाहेब बारणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील विविध भाषांमधील ५०५ पुस्तकांचा संग्रह शिवचरित्र अभ्यासकांना उपलब्ध करून दिला आहे. संभाजी बारणे यांचा शिवचरित्र संग्रह, तसेच यापूर्वी त्यांनी पिंपरी चिंचवड मधील सर्व नगरसेवकांच्या व्हिजिटिंग कार्डचा केलेला संग्रह, पिंपरी चिंचवड शहराची महती सांगणारा त्यांनी संपादित केलेला पिंपरी चिंचवड वैभव हा काव्यसंग्रह आणि शिवकालीन नाण्यांचा संग्रह करण्याचा त्यांचा संकल्प हा पुढील पिढीला मार्गदर्शक ठरेल असे गौरवोउद्गार खासदार श्रीरंग बारणे यांनी काढले.

खा. श्रीरंग बारणे यांनी नुकतीच संभाजी बारणे यांच्या थेरगाव येथील कार्यालयात भेट दिली. यावेळी माध्यम प्रतिनिधीशी संवाद साधताना खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले की, राजमाता जिजाऊसाहेब यांनी बालपणापासून शिवाजी महाराजांवर केलेले संस्कार, बालवयात महाराजांनी निवडक मावळ्यांना घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात स्वतःची करंगळी कापून शिवलिंगावर केलेला रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापन करण्यासाठी घेतलेली शपथ, शिवराज्याभिषेक सोहळ्याने नव्या युगाचा प्रारंभ, शिवमुद्रा, स्वराज्याचा विस्तार, आरमाराचे त्यांचे कौशल्य, जलनीती, शौर्यगाथा, दुर्ग विज्ञान, आग्र्याहून सुटका, महाराजांचे गनिमी कावा युद्धतंत्र, शिवकालीन मुस्लिम, सिद्धी व मराठा, धर्मनिरपेक्षता, लष्कर निपुण, त्यांचा वैज्ञानिक, आर्थिक व प्रशासकीय खरा इतिहास व कुशल प्रशासक, आदर्श राज्यकर्ता, राष्ट्रनिर्माता या महाराजांच्या चरित्रातील विविध पैलूंचा सखोल अभ्यास नव्या पिढीने केला पाहिजे. त्यासाठी शिवप्रेमींना, अभ्यासकांना पुण्यातील शासकीय ग्रंथालयात जावे लागते. परंतु आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरील मराठी सह इंग्रजी, हिंदी, गुजराती, सिंधी, उर्दू, कन्नड अश्या विविध भाषांमधील ५०५ पुस्तकांचा संग्रह थेरगाव येथील त्यांच्या कार्यालयात सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. याचा शिवचरित्र अभ्यासकांनी व युवा पिढीने लाभ घ्यावा असेही खासदार श्रीरंग बारणे यांनी संभाजी बारणे यांचे कौतुक करताना सांगितले.

या संग्रह विषयी अधिक माहिती देताना संभाजी बारणे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्या जीवनातील आदर्श आहेत. मी बालपणापासून महाराजांची पुस्तके वाचून घडत गेलो. महाविद्यालयीन काळात माझ्याकडे ३०० पेक्षा जास्त पुस्तकांचा संग्रह झाला. नंतर प्रवासानिमित्त बाहेर राज्यात गेल्यावर तेथील स्थानिक भाषेतील छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तके मी विकत घेतली आणि त्या पुस्तकांचे मराठीत भाषांतर करून त्यांचा अभ्यास केला. अशा पद्धतीने माझ्याकडे आतापर्यंत ५०५ पुस्तकांचा संग्रह झाला आहे.

हा संग्रह माझ्या कार्यालयात असलेल्या ग्रंथालयात मी शिवप्रेमींना, वाचकांना मोफत उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये केशव सिताराम ठाकरे, सेतू माधवराव पगडी, न. चि. केळकर, चिंतामण ढेरे, अरुण गोखले, प्रणव गोखले यांच्यासह ना. स. इनामदार, गोविंद पानसरे, शशिकांत पित्रे, श्रीपाल सबनीस, श्रीमंत कोकाटे, हरदास बाळशास्त्री, ब. मो. पुरंदरे, य. दि. फडके, प्र. के. घाणेकर, मंगेश इंगवले, राजाभाऊ इंदलकर, वामन गोपाळ उर्ध्वरेषे, सौरभ कर्डे, वसंत कानेटकर, नरहर कुरुंदकर, अ. रा. कुलकर्णी, पुरुषोत्तम खेडेकर, गणेश हरी खरे, निळकंठ खाडीलकर, गोपाळ चांदोरकर, लहू कचरू गायकवाड, फुलवंताबाई झोडगे, गिरीश टकले, एस. एन. तांबोळी, महेश तेंडुलकर, गो. नी. दांडेकर, रणजीत देसाई, दत्ताजी नलावडे, जयसिंगराव पवार, डॉ. अमोल कोल्हे, रोहित पवार, इस्माईल पठाण, मनोहर यशवंत, वालचंद नामचंद शहा, राजा लिमये, सुहास बहुळकर, प्रभाकर बागुल, निनाद बेडेकर, राम शास्त्री भागवत, ना. धो. महानोर, मा. गो. माळी, शामसुंदर मुळे, गजानन मेहेंदळे, शिरीष मोरे, शेख अहमद, विश्वनाथ शिंदे, वि. स. वाळिंबे तसेच महाराष्ट्र शासनाने शिवराज प्रशस्ती म्हणून प्रकाशित केलेले पुस्तक आदी मराठी लेखकांसह हिंदी, इंग्रजी, गुजराती, सिंधी, उर्दू, कन्नड या भाषेतील शिवचरित्र पुस्तकांचा संग्रह आहे. संभाजी बारणे यांच्या या पुस्तक संग्रहाचे सर्व थरातून कौतुक होत आहे