WHO समोर आर्थिक संकट,अमेरिकेची जागतिक आरोग्य संघटनेतून अधिकृत माघार

0
6

दि.२४(पीसीबी)-अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO मधून अधिकृतपणे माघार घेतली आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या या महत्त्वाच्या आरोग्य संस्थेला आपल्या सर्वात मोठ्या देणगीदारांपैकी एक गमवावा लागला आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करून WHO मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. कोविड-१९ महामारीच्या काळात WHO ने चीनकडे झुकते माप दिल्याचा आरोप करत ट्रम्प प्रशासनाने या संस्थेवर टीका केली होती.अमेरिकेच्या आरोग्य आणि मानवी सेवा विभागाने सांगितले की, कोविड महामारीच्या काळात WHO कडून झालेल्या कथित गैरव्यवस्थापनामुळे, संस्थेत सुधारणा करण्यास असमर्थतेमुळे आणि सदस्य देशांच्या राजकीय हस्तक्षेपामुळे हा निर्णय घेण्यात आला.

मात्र WHO ने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. WHO चे महासंचालक टेड्रोस अढानोम घेब्रेयेसस यांनी अमेरिकेची माघार ही अमेरिका आणि संपूर्ण जगासाठी नुकसानकारक असल्याचे म्हटले आहे. पोलिओ, एचआयव्ही-एड्स, मातामृत्यू रोखण्यासाठी तसेच तंबाखू नियंत्रणासंदर्भातील आंतरराष्ट्रीय करारामध्ये WHO ने महत्त्वाची भूमिका बजावल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

कोविडनंतर भविष्यातील महामारी रोखण्यासाठी, त्यांची तयारी आणि प्रभावी प्रतिसाद यासाठी WHO सदस्य देशांनी आंतरराष्ट्रीय महामारी करारावर काम केले होते. लसी आणि औषधांचे न्याय्य वाटप करण्याचा उद्देश असलेला हा करार एप्रिलमध्ये मंजूर झाला, मात्र अमेरिका या करारात सहभागी झाली नाही.
अमेरिका ही WHO ची मोठी आर्थिक मदत करणारी देशांपैकी एक होती. मात्र २०२४ आणि २०२५ या वर्षांचे शुल्क अमेरिकेने भरलेले नसल्याने WHO ला मोठ्या प्रमाणावर नोकरकपात करावी लागली आहे. WHO च्या वकिलांच्या मते अमेरिका सुमारे २६० दशलक्ष डॉलर इतकी थकबाकी भरण्यास बांधील आहे, परंतु वॉशिंग्टनने ती देण्यास नकार दिला आहे.

अमेरिकेने WHO साठीचा सर्व सरकारी निधी थांबवण्यात आला असून, जिनिव्हा येथील मुख्यालयासह जगभरातील WHO कार्यालयांत कार्यरत असलेले अमेरिकी कर्मचारी आणि कंत्राटदारांना परत बोलावण्यात आले आहे. तसेच WHO सोबतचे शेकडो सहकार्य प्रकल्प स्थगित किंवा बंद करण्यात आले आहेत.
दरम्यान, अमेरिकेचे आरोग्य मंत्री रॉबर्ट एफ. केनेडी आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी संयुक्त निवेदनात WHO ने अमेरिकेच्या हिताविरुद्ध काम केल्याचा आरोप केला आहे. पुढील काळात अमेरिकेचा WHO सोबतचा संपर्क केवळ माघारीची प्रक्रिया पूर्ण करण्यापुरता आणि अमेरिकन नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठीच मर्यादित राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.WHO कडून मात्र पुन्हा एकदा अमेरिका निर्णयाचा पुनर्विचार करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. WHO आणि अमेरिकेच्या सहकार्यामुळे आतापर्यंत लाखो जीव वाचल्याचे सांगत, अमेरिकेची माघार ही जागतिक आरोग्यासाठी मोठा धक्का असल्याचे WHO ने नमूद केले आहे.