निवडणुकीत ६९२ उमेदवारांपैकी ४२३ जणांचे डिपॉझिट जप्त

0
6

दि.२३(पीसीबी)-पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक रिंगणात उतरलेल्या ६९२ विविध राजकीय पक्षासह अपक्ष उमेदवारांपैकी ४२३ जणांची अनामत (डिपॉझिट) रक्कम जप्त झाली आहे. २६९ उमेदवारांची अनामत रक्कम वाचली आहे.

महापालिका निवडणुकीच्या रिंगणात भाजपचे १२३, राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) पक्षाचे १२२, शिवसेना (शिंदे) पक्षाचे ५८, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे ४६, काॅंग्रेसचे ४७, वंचित आघाडीतर्फे ३६, आम आदमी पार्टीचे ३२, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे १३, राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) पक्षाचे ११ आणि अपक्ष २०४ असे ६९२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात हाेते. त्यापैकी भाजपचे ८४, राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) पक्षाचे ३७, शिवसेना (शिंदे) पक्षाचे ६ आणि एक अपक्ष असे १२८ नगरसेवक निवडून आले आहेत. निवडणुकीत ५६४ जणांना अपयशाला सामोरे जावे लागले. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या एकाही उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली नाही.

महापालिका निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना (शिंदे) पक्षाने ५८ उमेदवार उतरवले होते. त्यांपैकी १४ उमेदवारांची अनामत रक्कम वाचली आहे, तर ४४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. दुसरीकडे काँग्रेससाठी ही निवडणूक अत्यंत निराशाजनक ठरली. काँग्रेसच्या ४७ उमेदवारांपैकी केवळ एका उमेदवाराची अनामत रक्कम वाचली. ४६ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या पाच जणांची अनामत रक्कम वाचली असून सहा जणांची जप्त झाली आहे. वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी, बसप जाणि सनय छत्रपती शासन या पक्षांच्या सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. अपक्ष उमेदवारांपैकी केवळ सहा उमेदवारांची अनामत रक्कम वाचली असून १९८ अपक्षांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला ठरावीक रक्कम जमा करणे बंधनकारक असते. वेगवेगळ्या निवडणुकीसाठी वेगवेगळी रक्कम निर्धारित करण्यात आली आहे. आरक्षणांतर्गत असलेल्या उमेदवाराला ही रक्कम कमी असते. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, कोणत्याही उमेदवाराला त्याची अनामत वाचवण्यासाठी मतांचा ठराविक कोटा पार करावा लागतो. प्रभागात पडलेल्या एकूण वैद्य मतांच्या किमान १/६ (सहावा हिस्सा किंवा एक षष्ठांश) मते मिळवणे अनिवार्य असते. एकूण वैध मतांच्या १६.६७ टक्क्यांपेक्षा कमी मते मिळाली, तर उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होते.