पिंपरीचे चिंचवडचे अर्धे नगरसेवक दहावी बारावी उत्तीर्ण

0
3

दि.२२(पीसीबी)-पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये निवडून आलेल्या १२८ नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये चौथी ते सातवीपर्यंत शिकलेले नऊ, आठवी ते नववीपर्यंत शिक्षण घेतलेले २२ नगरसेवक आहेत. दहावी आणि बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले सर्वाधिक ५८ नगरसेवक आहेत. काही नगरसेवक पदवीधर, डॉक्टर, वकील, अभियंते आहेत.

महापालिकेमध्ये भाजपचे सर्वाधिक ८४, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ३७, शिवसेना (शिंदे) पक्षाचे सहा आणि एक अपक्ष नगरसेवक निवडून आला आहे. महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या १२८ नगरसेवकांच्या शैक्षणिक पात्रतेची आकडेवारी पाहिली असता, महापालिका सभागृह हे शिक्षणाच्या विविध स्तरांचे प्रतिनिधित्व करणारे व्यासपीठ ठरले आहे.

उच्चशिक्षित नगरसेवकांचाही महापालिकेच्या सभागृहात लक्षणीय सहभाग आहे. बीए, बीकॉम, बीएस्सी अशा पदवीधर नगरसेवकांची संख्या ३३ आहे. याशिवाय एमए, एमकॉम, एमएस्सी, एमबीए सारखे पदव्युत्तर पदवी घेतलेले सहा नगरसेवक निवडून आले आहेत. महापालिकेच्या सभागृहात डॉक्टर, वकील, अभियंते आणि शिक्षकही असणार आहेत. त्यामुळे आरोग्य, कायदा, शिक्षण आणि विकासकामांबाबत महापालिका सभागृहात अभ्यासपूर्ण चर्चा होऊ शकेल.

अभियंते, वकील, डॉक्टर सभागृहात
चाैथी ते सातवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले नऊ, आठवी व नववीपर्यंत शिक्षण झालेले २२, दहावी उत्तीर्ण असलेले २५, अकरावी व बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले ३३ नगरसेवक आहेत. ३३ पदवीधर असून सहा जणांनी पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्यामध्ये चार अभियंते, तीन शिक्षक, दोन वकील आणि एक डॉक्टरही महापालिका सभागृहात असणार आहेत.

कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक
महापालिका निवडणुकीत भाजपची दुसऱ्यांदा एकहाती सत्ता आली आहे. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा पराभव केला. भाजपच्या चारही आमदारांनी यशस्वी रणनिती अवलंबून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मात केली. भाजपचे सर्वाधिक ८४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ ३७ नगरसेवक निवडून आले. शिवसेना (शिंदे) पक्षाचे सहा आणि एक अपक्ष नगरसेवक निवडून आला आहे.