बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून डोंबिवली पश्चिम भाग ओळखला जातो. या भागात गेल्या २५ वर्षात विविध पक्षातील स्थानिक नगरसेवकांच्या माध्यमातून मोकळ्या जागा, पालिकेचे आरक्षित भूखंड, खाडी किनारचे कांदळवन नष्ट करून बेकायदा चाळी, इमारतींची बांधकामे करण्यात आली आहेत. ही बेकायदा बांधकामे करणारे आताच्या कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. अशा एकूण सहा नगरसेवकांच्या विरूध्द दोन तक्रारदारांनी स्वतंत्रपणे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे.
तसेच, एक नगरसेवक आपल्या पत्नीसह बेकायदा बंगल्यात राहत आहे. या बंगल्याच्या फक्त तळमजल्याला कल्याण डोंबिवली पालिकेचा मालमत्ता कर लावण्यात आला आहे. बंगल्याच्या वरच्या माळ्यांना मालमत्ता कर लावण्यात आलेला नाही. या नगरसेवकांविरूध्द एक जागरूक नागरिक उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.
डोंबिवली पश्चिमेतील काही नगरसेवक आपल्या पंटरच्या साथीने बेसुमार बेकायदा चाळी आणि मोक्याच्या जागांवर बेकायदा इमारती उभारत असल्याच्या तक्रारी कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त आणि ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्याकडे केल्या. या अधिकाऱ्यांनी या बेकायदा बांधकामांवर कारवाई केल्या नसल्याच्या तक्रारदार मयूर म्हात्रे, कल्पेश जोशी यांनी सांगितले. डोंबिवली पश्चिमेत देवीचापाडा, राजूनगर, अनमोलनगरी, कुंभारखाणपाडा, गणेशनगर, कोपर परिसरातील खाडी किनारचे कांदळवनाचे जंगल नष्ट करून या नगरसेवकांच्या समर्थकांनी, नातेवाईकांनी बेकायदा चाळी उभारल्या आहेत.
आताही देवीचापाडा, कोपर भागात बेकायदा चाळी उभारणीची कामे सुरू आहेत. या नगरसेवकांच्या आशीर्वादाने ही सर्व बेकायदा चाळींची बांधकामे सुरू आहेत. या नगरसेवकांच्या दबावामुळे ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त या बेकायदा चाळींवर, इमारतींवर कारवाई करत नाहीत. भूमाफियांवर एमआरटीपीचा गुन्हा दाखल करून बेकायदा इमारतीला अभय दिले जाते, असे डोंबिवली पश्चिम गणेशनगर-राजूनगर भागातील तक्रारदार मयूर म्हात्रे यांनी सांगितले.
न्यायालयात धाव
बेकायदा बांधकाम प्रकरणी दहा वर्षापूर्वी कल्याण डोंबिवली पालिकेतील दोन नगरसेवक उच्च न्यायालयाच्या आदेशावरून अपात्र ठरले होते. हाच आधार घेऊन मयूर म्हात्रे, कल्पेश जोशी यांनी पाच नवनिर्वाचित नगरसेवकांविरूध्द याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मागील वर्षभर डोंबिवली पश्चिमेतील अनेक इमारती, बेकायदा चाळींच्या संदर्भात आम्ही पालिकेत तक्रारी केल्या. त्याची दखल पालिका आयुक्तांसह ह प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली नाही. स्थानिक नगरसेवक, पालिका अधिकारी यांच्या समन्वयाने डोंबिवली पश्चिम ह प्रभागात बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. ही सर्व बेकायदा बांधकामे नगरसेवकांच्या आशीर्वादाने उभी राहिली आहेत. या बेकायदा बांधकामातून मिळालेला पैसा या नगरसेवक, त्यांच्या नातेवाईक यांच्या बँक खात्यावर वळता झाला आहे. याची कागदपत्रे आपल्याकडे उपलब्ध आहेत. ही माहिती आम्ही न्यायालयात सादर करणार आहोत, असे मयूर म्हात्रे यांनी सांगितले.
हे सगळे बेनामी व्यवहार असल्याने याप्रकरणाची आपण ईडी, आयकर विभाग आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार करणार आहोत, असे मयूर म्हात्रे आणि कल्पेश जोशी यांनी सांगितले.












































