- भजनसम्राट अनुप जलोटा यांचा सल्ला
ऑस्कर विजेते संगीतकार आणि गायक ए. आर. रहमान यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गेल्या 8 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये त्यांना काम मिळणं बंद झाल्याचं मान्य केलं. बॉलिवूड इंडस्ट्री आता अधिक सांप्रदायिक झाल्याचीही टिप्पणी त्यांनी केली होती. तर विकी कौशलचा ‘छावा’ हा चित्रपट फूट पाडणारा असल्याचं मत रहमान यांनी मांडलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेकांनी सांप्रदायिकतेमुळे त्यांना काम न मिळण्याच्या तक्रारीला विरोध केला. याप्रकरणी आता भजनसम्राट अनुप जलोटा यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. अनुप जलोटा यांनी थेट रहमान यांना धर्मांतर करण्याचा सल्ला दिला आहे.
‘आयएएनएस’ला दिलेल्या मुलाखतीत अनुप जलोटा म्हणाले, “जर ए. आर. रहमान यांना असं वाटत असेल की धर्माच्या कारणामुळे त्यांना काम मिळत नाहीये, तर त्यांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारण्याविषयी विचार करावा.” यावेळी अनुप जलोटा यांनी रहमान यांच्या पार्श्वभूमीचा उल्लेख करत सांगितलं की ते आधी हिंदू होते आणि नंतर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यानंतरही त्यांनी संगीत विश्वात प्रचंड लोकप्रियता मिळवली, पैसा-प्रसिद्धी कमावली आणि लोकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. परंतु जर रहमान यांना असं वाटत असेल की धर्मामुळे त्यांना कामाच्या संधी मिळेनासे झाले आहेत, तर त्यांनी आपला जुना धर्म पुन्हा स्वीकारण्याविषयी विचार करावा, असा सल्ला जलोटा यांनी दिला.
याविषयी जलोटा पुढे म्हणाले, “जर त्यांना या गोष्टीवर विश्वास असेल की आपल्या देशात मुस्लीम असल्या कारणाने त्यांना काम मिळत नाहीये, तर त्यांनी पुन्हा हिंदू व्हावं. त्यांना असा विश्वास असावा की हिंदू असल्याने त्यांना पुन्हा चित्रपट मिळतील. रहमान यांच्या म्हणण्याचा हाच अर्थ होता. म्हणून मी त्यांना हिंदू धर्म स्वीकारण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला देतोय. त्यानंतर त्यांनी पुन्हा काम मिळतंय का, ते पहावं.”
‘बीबीसी एशियन नेटवर्क’ला दिलेल्या मुलाखतीत रहमान यांना विचारलं गेलं की, अनेक निर्माते आणि कलाकारांनी दावा केला की बॉलिवूडमध्ये तमिळ समुदायासोबत भेदभाव होतो. 1990 च्या दशकात ही स्थिती कशी होती? त्यावर ते म्हणाले, “मला असं कधी जाणवलं नाही किंवा कदाचित माझ्यापासून ते लपवलं गेलं असावं. गेल्या 8 वर्षांत कदाचित सत्ता बदलली आहे आणि जे क्रिएटिव्ह नाहीत, ते निर्णय घेत आहेत. यात कदाचित काही सांप्रदायिक गोष्टीही असतील, पण मला थेट कोणी काही सांगितलेलं नाही. काही गोष्टी कानावर आल्या की, तुम्हाला बुक केलं होतं, पण दुसऱ्या म्युझिक कंपनीने फंडिंग केलं आणि त्यांनी आपला संगीतकार आणला. त्यावर मी म्हणालो, ठीक आहे, मी आराम करेन आणि कुटुंबासोबत अधिक वेळ घालवेन.”












































