शिंदेंना शह देण्यासाठी ठाकरे गटाची भाजपाबरोबर पडद्याआड चर्चा सुरू

0
2

दि.१९(पीसीबी)-मुंबई महापालिका निवडणुकीत निर्विवाद बहुमत मिळविल्यानंतर भाजपा व शिंदे गटाच्या युतीत महापौरपदावरून चुरस निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असले तरीही त्यांना स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. महापालिकेत सत्तास्थापन करण्यासाठी भाजपाला आपल्या मित्रपक्षाच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. मात्र, शिंदे गट भाजपाला सहजपणे महापौरपद देण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदेंना शह देण्यासाठी ठाकरे गटाची भाजपाबरोबर पडद्याआड चर्चा सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचाच भाग म्हणून महापौर निवडीवेळी ठाकरे गटाचे ६५ नगरसेवक अनुपस्थित राहणार अशी रणनीती आखल्याचे समजते आहे. त्याविषयीचा हा आढावा…

महापौरपदावरून शिंदे-भाजपात चुरस

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यानिमित्ताने भाजपाने तळागाळातील आपली पाळेमुळे आणखीनच घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे ‘शत प्रतिशत भाजपा’ हे लक्ष्य साध्य करण्यासाठी पक्षाने आगेकूच केली केली आहे. यादरम्यान महायुतीतील आपले राजकीय महत्व अधोरेखित करण्यासाठी शिंदे गटानेही कंबर कसली आहे. मुंबईच्या महापौरपदाबाबत कोणतीही तडजोड होणार नसल्याचे स्पष्ट संकेत शिंदे गटाने दिले. महायुतीतील या अंतर्गत कलहाचे चित्र शनिवारीच दिसून आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे गैरहजर राहिले. यापूर्वीही त्यांनी फडणवीस सरकारच्या काही निर्णयांवर नाराजी व्यक्त करून बैठकीकडे पाठ फिरवली होती.

शिंदेंचे नगरसेवक पंचतारांकित हॉटेलात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या निवडून आलेल्या सर्व २९ नगरसेवकांना मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात ठेवले आहे. विरोधी पक्षांकडून फोडाफोडीची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले आहे. दुसरीकडे- कडक वाटाघाटींत तरबेज असलेल्या भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी मुंबईच्या महापौरपदाचा निर्णय या आठवड्यात होणार नसल्याची शक्यता वर्तवली आहे. २२७ जागांच्या महानगरपालिकेत ८९ जागा जिंकून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, बहुमताचा आकडा पार करण्यासाठी त्यांना मित्रपक्ष असलेल्या शिंदे सेनेच्या २९ नगरसेवकांच्या पाठिंब्यावर अवलंबून राहावे लागणार आहे.

आणखी वाचा : भाजपाकडून ठाकरे गटाला महापौरपदाची ऑफर? शिंदेंनी नगरसेवक हॉटेलात का ठेवले? वाचा ५ घडामोडी…

भाजपाचे वरिष्ठ नेतृत्व करणार मध्यस्थी?

सूत्रांच्या माहितीनुसार, महापौरपदाचा पेचप्रसंग सोडविण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून हस्तक्षेप केला जाण्याची शक्यता आहे. या पेचप्रसंगात आता केंद्रातून हस्तक्षेप होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या एकसंध शिवसेनेने भाजपाशी फारकत घेऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. त्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा घेण्यात आला होता. तेव्हापासून मुंबई महापालिकेची सत्ताकाबीज करण्याचे ध्येय भाजपाने ठेवले होते. यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजपा व शिंदे गटाच्या युतीने निर्विवाद बहुमत मिळवून ठाकरेंची २५ वर्षांची एकहाती सत्ता संपुष्टात आणली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

महापौरपदावरून शिंदे गट व भाजपात रस्सीखेच सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी आपली भूमिका स्पष्ट केली. मुंबईत महायुतीचाच महापौर विराजमान होईल आणि तो हिंदू-मराठी असेल, असे फडणवीसांनी सांगितले. यावेळी महापौरपदावरून युतीमध्ये मतभेद असल्याच्या वृत्तांचे त्यांनी खंडन केले. महापौर कोण आणि किती वर्षांसाठी असेल, याचा निर्णय मी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्रित बसून घेणार आहोत. महापौर पदावरून आमच्यात कोणताही वाद नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शिंदे गटाच्या नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना काही दिवसांसाठी हॉटेलमध्ये हलवण्यात आल्याच्या मुद्द्यावर फडणवीस म्हणाले की, नव्याने निवडून आलेल्या सदस्यांशी चर्चा करण्यासाठी शिंदे यांनी बैठक बोलावली असावी. भाजपानेही आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक घेतली आहे.