दि.१९(पीसीबी)-अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना तातडीने पक्षातून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी भाजपाच्या पराभूत उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. महापालिकेतील आमचा पराभव हा जनतेने नव्हे तर नवनीत राणा यांनीच केला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. नवनीत राणा यांना बाहेरचा रस्ता न दाखवल्यास त्या भविष्यात अमरावती शहरात भाजपाचा पूर्णपणे नायनाट केल्या शिवाय राहणार नाहीत.
भाजपाचे उमेदवार डमी आणि युवा स्वाभिमानचे उमेदवार हेच खरे असल्याचा प्रचार राणा यांनी केला. आमच्या पराभवासाठी त्यांनी काही पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून प्रचार केला. प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आम्हाला आशीर्वाद असल्याचे राणा दाम्पत्य उघडपणे सांगत होते. त्यांच्या प्रचारामुळेच भाजपाचे पारंपारिक मतदार गोंधळात पडले. त्यामुळे नवनीत राणा यांना युवा स्वाभिमान पक्षासाठी मोकळे करा, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.












































