दररोज पाणीपुरवठा करणे शक्य नाही भाजप शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचे विधान

0
6

दि.१९(पीसीबी)-पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येला अतिरिक्त पाणी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. दररोज पाणीपुरवठा करणे शक्य नाही मात्र, एक दिवसाआड पुरेशा दाबाने पाणी दिले, तर सर्व नागरिकांना समान पाणी मिळेल, असे सांगत भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी शहराला दररोज पाणी पुरवठा शक्य नसल्याचे स्पष्ट केले.

महापालिका निवडणुकीत ८४ नगरसेवकांसह भाजपची एकहाती सत्ता आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपची रविवारी पत्रकार परिषद झाली. आमदार महेश लांडगे, अमित गोरखे, सरचिटणीस विकास डोळस यावेळी उपस्थित होते.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराला दररोज पाणीपुरवठा होत नसून नागरिकांचे हाल सुरू असल्याची टीका केली होती. याबाबत विचारले असता शहराध्यक्ष काटे म्हणाले, ‘आंद्रा, भामा-आसखेड धरणांमधून अतिरिक्त पाणी आणले आहे. शहराची लोकसंख्या ३५ लाखांच्या घरात असून आगामी दहा वर्षांत लोकसंख्येत मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्‍न गंभीर होणार आहे. सध्या नागरिकांना दररोज पाणी देण्यापेक्षा एक दिवसाआड पुरेशा दाबाने पाणी दिले तर समान पाणी मिळेल असे सांगत दररोज पाणीपुरवठा शक्य नसल्याचे’ त्यांनी स्पष्ट केले

‘विकास आराखडा रद्द करून शहराचा विकास साधता येत नाही. ज्याठिकाणी चुकीचे आरक्षण पडले होते, त्याठिकाणचे आरक्षण रद्द करण्यासाठी पाठपुरावा केला आहे. नागरिकांनी विकास आराखड्याबद्दल आक्षेप घेतले आहेत. ते आक्षेप आणि स्थानिक नेते, नागरिक यांना विचारात घेऊन आराखडा रद्द करण्यापेक्षा या आराखड्यात दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे’ काटे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा सत्तेत सहभाग नाही

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष भाजपसोबत सत्तेत सहभागी आहे, महापालिकेत त्यांना सामावून घेणार का? असे विचारले असता काटे म्हणाले, ‘महापालिकेत भाजपला एकहाती सत्ता मिळाली आहे. त्यामुळे महापौर हा भाजपचा असेल. दोन दिवसांत आरक्षण सोडत होणार आहे, त्यानंतर महापौर निवड होईल असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचा सत्तेत सहभागी करून घेतले जाणार नसल्याचे’ त्यांनी स्पष्ट केले.

पराभूत जागांचा कारणमीमांसा अहवाल प्रदेशला पाठवणार

‘शंभर पारचा नारा दिला होता. मात्र, काही ठिकाणी अनपेक्षितपणे चांगल्या उमेदवारांचा पराभव झाला. काही ठिकाणी झालेल्या ‘क्रॉस वोटिंग’मुळे उमेदवारांना फटका बसला आहे. या पराभवाची कारणे शोधून याबाबत प्रदेशाध्यक्षांकडे अहवाल दिला जाणार असल्याचे’ही त्यांनी सांगितले.

निवडणूक म्हटल्यानंतर आरोप होत असतात. आरोपांना भाजपने विकास कामांच्या माध्यमातून उत्तर दिले. याचा भाजपला फायदा झाला आणि मागील तुलनेमध्ये नगरसेवकांमध्ये वाढ झाली आहे, असे भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले.