पिंपरी, दि. १७ – पिंपरी चिंचवड महापिलकेत भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविले. १२८ जागांपैकी तब्बल ८४ जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर आणि विशेषतः भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यावर घनाघाती आरोप आणि कठोर शब्दांत टीका केली. आमदार लांडगे यांनीसुध्दा पवार यांच्यावर थेट, `आम्हीसुध्दा हातात बांगड्या भरल्या नाहीत…` असे आव्हान दिले. दोघांमधील हे शाब्दिक युध्द टोकाला गेले आणि प्रचारात रंगत आली. दरम्यान, या सर्व वाद आणि आरोप-प्रत्यारोपात न पडता चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रात अगदी शांततेत प्रचार करत मतदारसंघ पिंजून काढल्याने त्यांच्या समर्थक नगरसेवकांची संख्या सर्वाधिक ३७ पर्यंत पोहचली.
भाजपचे एकूण ८४ नगरसेवक विजयी झाले, विधानसभा मतदारसंघानुसार त्याची फोड केली तर आमदार जगताप यांच्या चिंचवडमधील संख्या वाढली आहे. १६, १७, १८, २२, २३, २४, २५, २६, २७, २८, २९, ३१ आणि ३२ असे एकूण १३ प्रभागात मिळून एकूण ५२ सदस्य आहेत. भाजपचे सर्वाधिक ३७ नगरसेवक या विधानसभा मतदारसंघातून जिंकल्याने आमदार जगताप यांचे वजन वाढले आहे. राष्ट्रवादीचे केवळ १० आणि उर्वरी ५ शिवसेना शिंदे गटाचे आहेत.
आमदार शंकर जगातप यांना समर्थन वाढल्याने राष्ट्रवादीचे नेते नाना काटे, मोरेश्वर भोंडवे यांचा करकचून ब्रेक लागला आहे. नाना काटे यांच्या प्रभागात भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासह तीन नगरसेवक जिंकले, तर राष्ट्रवादीचे मोरेश्वर भोंडवे यांचा पत्नीसह पराभव झाला. राहुल कलाटे आणि नवनाथ जगताप यांच्यासह विरोध करणाऱ्या सर्व माजी नगरसेवकांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केल्याने चिंचवडचा गड भाजपसाठी भक्कम झाला आहे.
यापूर्वी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि त्यांच्या निधनानंतर आमदार आश्विनी जगताप यांचे नेतृत्व भाजपच्या नगरसेवकांनी मान्य केले आता शंकर जगताप यांच्याकडे सर्व सूत्र आली आहेत.
भोसरीत फक्त ३७ जागा –
भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी अजित पवार यांना थेट अंगावर घेत अकांडतांडव केला. अगदी खालच्या शब्दांत टीका केल्याने भाजप निष्ठावंत आणि रा.स्व.संघाचे नेतेही त्यांच्यावर नाराज होते. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज दिल्यावर आमदार लांडगे यांनी माघार घेतली आणि रितसर प्रचार केला. मोठा राडा केला. भोसरीमध्ये १२ प्रभागांच्या मिळून ४८ पैकी अवघ्या ३५ जागांवर भाजपने यश संपादन केले. सर्व ठिकाणी मतांचे आकडे पाहिले तर, अगदी अटितटीच्या लढती झाल्या. २०१७ मध्ये ३२ जागांवर भाजप जिंकली होती. यावेळी ४२ पर्यंत जागा जिंकण्याची वल्गना केली होती पण तो आकडा ३५ पर्यंत खाली आला. १२ जागांवर राष्ट्रवादी जिंकली होती. प्रत्यक्षात चिंचवड विधानसभेत भाजपचे नगरसेवक मोठ्या फरकाने जिंकले असताना भोसरीत मात्र अनेक ठिकाणी निसटता विजय झाला. प्रभाग क्रमांक १,५, ७, ८ मध्ये राष्ट्रवादीचे पारडे जड ठरले. प्रभाग ९ मध्ये भाजपचे पूर्ण पॅनल पराभूत झाले. महापालिका निवडणुकिच्या तोंडावर भाजपमध्ये जे प्रवेश दिले त्या नाराजीचा सामना आमदार लांडगे यांना करावा लागला आणि त्याचाही परिणाम झाला.









































