दि.१३(पीसीबी)-पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपच्या उमेदवाराकडून आचारसंहितेचा गंभीर भंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भाजपचे (प्रभाग क्रमांक ८) मधील अधिकृत उमेदवार श्री. विलास हनुमंतराव मडिगेरी यांच्याविरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निवडणूक आयोगाच्या स्पष्ट आदेशानुसार रात्री प्रचारास बंदी असतानाही, उमेदवाराने उघडपणे प्रचार केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास, मोशी प्राधिकरण परिसरातील स्पाईन रोडवरील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी जाऊन उमेदवाराने स्वतःचा व्हिडिओ तयार केल्याचा आरोप आहे.या व्हिडिओमध्ये भाजपचे निवडणूक चिन्ह आणि प्रचार साहित्याचा वापर करून, शासकीय कामाचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होत आहे. सदर व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा डाव आखण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.विशेष म्हणजे संबंधित रस्त्याचे काम पुणे ग्रँड चॅलेंज टूर (PGCT) अंतर्गत असून, यासाठी शासनाने यापूर्वीच २४ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
असे असतानाही, हे काम आपणच केल्याचा दावा करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. हा प्रकार लोकशाही प्रक्रियेवर घाला असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी उमेदवाराविरोधात BNS कलम २२३ व १७५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सत्ताधाऱ्यांकडून कायद्याला पायदळी तुडवण्याची वृत्ती पुन्हा एकदा जनतेसमोर उघडी पडल्याची चर्चा सुरू आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि नियमांचे पालन किती आवश्यक आहे, यावर या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.









































