गुन्हा दाखल, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
दि.११(पीसीबी)-पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य वाहतूक व वितरणास आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत राज्य उत्पादन शुल्क, जी विभाग, पुणे कार्यालयाने ९ जानेवारी २०२६ रोजी पिंपरी परिसरात परराज्यातून (दमण) बेकायदेशीररीत्या आणलेले ११२.३२ बल्क लिटर विदेशी मद्य तसेच मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले एक चारचाकी वाहन असा एकूण ७ लाख २० हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पवनेश्वर मंदिराजवळ ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध दारू विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. नुकतीच पिंपरी येथील पवनेश्वर मंदिराजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई करीत बेकायदेशीररीत्या आणलेले ११२.३२ बल्क लिटर विदेशी मद्य जप्त केले. या प्रकरणी जवान प्रमोद पालवे (जी-१) यांनी फिर्याद दिली असून त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संजय कोल्हे, दुय्यम निरीक्षक गणेश पठारे, ब्रह्मानंद रेडेकर, जवान समीर बिरांजे, विजय घंदुरे, अमोल कांबळे यांच्यासह एसएसटी पथक, पिंपरी पोलीस स्टेशनच्या पथकाने ही कारवाई केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास दुय्यम निरीक्षक अभय औटे (जी-१) हे करीत आहेत.
दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या कालावधीत अवैध मद्य वाहतूक, साठवणूक व विक्री यांसह कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणाऱ्या कोणत्याही बेकायदेशीर बाबींविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही अवैध कृतींची माहिती त्वरित संबंधित यंत्रणांना द्यावी व निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.







































