पिंपरी चिंचवड शहरातील मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड,संभाजी ब्रिगेडचे शेकडो कार्यकर्ते होणार सहभागी.
दि.१०(पीसीबी)-मराठा सेवा संघाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मातृ तीर्थ सिंदखेडराजा जिल्हा बुलढाणा येथे जिजाऊंचे जन्मस्थान राजे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा आणि जिजाऊ सृष्टी येथे ११ व १२ जानेवारी रोजी लाखों जिजाऊ प्रेमींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव सोहळा संपन्न होणार आहे.११ जानेवारी रोजी सायंकाळी राजवाड्यात दीपोत्सव तसेच जिजाऊ सृष्टी ते राजवाडा अशी जिजाऊ ब्रिगेडच्या ४२८ महिला मशाल यात्रा काढणार आहेत.यानंतर जिजाऊ सृष्टी येथे देशभरातून विविध राज्यातून आलेल्या महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
१२ जानेवारीला सूर्योदयापूर्वी दहा जोडप्यांच्या हस्ते राजवाड्यात महापूजा होणार आहे. सकाळी सात वाजता राजवाडा ते जिजाऊ सृष्टी अशी भव्य वारकरी दिंडी निघणार आहे. सकाळी नऊ वाजता जिजाऊ सृष्टीवर शिव धर्म ध्वजारोहण संपन्न होणार आहे. दिवसभर जिजाऊ सृष्टीवर विविध कार्यक्रम होणार आहेत. प्रबोधनात्मक पुस्तकांचे चारशे स्टाॅल लागणार असून दरवर्षी प्रमाणे कोट्यावधी रूपयांची पुस्तक विक्री होणार आहे. सायंकाळी मराठा सेवा संघ संस्थापक अॅड. पुरूषोत्तम खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अंतीम कार्यक्रम होणार आहे.
यावेळी मराठा सेवा संघाचे सर्वोच्च पुरस्कार देऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.दरवर्षी प्रमाणे अॅड पुरूषोत्तम खेडेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड,संभाजी ब्रिगेड,उद्योजक कक्ष यांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील संततुकारामनगर, वाल्हेकरवाडी,भोसरी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शहरातून मराठा सेवा संघासह विविध कक्षाचे शेकडो कार्यकर्ते सिंदखेडराजा येथील कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे यांनी कळवले आहे.तसेच मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील जिजाऊ जन्मोत्सवास पिंपरी चिंचवड शहरातील शिवप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केले आहे.









































