पिंपरी, दि. ३ : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी ४४३ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता १२८ जागांसाठी निवडणूक रिंगणात ६९२ उमेदवार राहिले आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी ३० डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. या मुदतीत ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी एक हजार ९९३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीमध्ये ९९ जणांचे अर्ज अपात्र ठरले. एक हजार ८९४ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यापैकी गुरुवारी राजकीय पक्षांसह ३८ अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली होती. शुक्रवारी शेवटच्या दिवशी ४४३ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे ६९२ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. दरम्यान, आठ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालया अंतर्गत माघार घेतलेल्या उमेदवारांमध्ये ह क्षेत्रीय कार्यालयात सर्वाधिक ८३, ब – ७०, ड-६३, अ-५७, क-५४, फ-४३, ग-४०, इ-३३ अशा ४४३ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत.
या प्रमुख उमेदवारांची माघार
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या उमेदवार वर्षा भालेराव, मनसेच्या गीता चव्हाण, माजी नगरसेविका सविता वायकर, भाजपच्या बंडखाेर हर्षदा थोरात, मंदा ठाकरे, निर्मला कुटे, सुवर्णा बुर्डे, आशा सुपे, निशा यादव, सुनिता तापकीर, आशा शेंडगे, माऊली थाेरात, माधवी राजापुरे, मंदा आल्हाट, सुषमा तनपुरे, विमल काळे, माधुरी कुलकर्णी, छाया साबळे, काेमल मेवाणी, काॅंग्रेसचे उमेदवार माधव पाटील, गंगा धेंडे, राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) पक्षाच्या महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, जयसिंग भाट, कल्पना घंटे यांच्यासह ४४३ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे)-मनसे आघाडीत लढत आहेत. भाजप, शिवसेना (शिंदे), काँग्रेस स्वबळावर निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यामुळे पिंपरीतील निवडणूक पंचरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले.












































