राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी महायुतीचा धर्म बाजूला ठेवत पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपवर गंभीर आरोपांच्या फैरी झाडल्या. 2017 मध्ये मोदी लाट आणि विठ्ठलाच्या मूर्तीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे आमची सत्ता गेली. मात्र, सत्तेत आलेल्यांनी प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार केला आहे. आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या पिंपरी-चिंचवड मनपाच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर करुन ठेवला. रस्तेखोदाई, कचरा, रस्तेबांधणी, पदपथ बांधणे, कुत्र्यांची नसबंदी अशा प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार केला आहे. शहरातील नेत्यांनी रस्त्याच्या अलीकडे आणि पलीकडे असे शहर वाटून घेतले आहे. प्रत्येक कामाच्या ‘टेंडर’मध्ये ‘रिंग’ केली जाते, असे गंभीर आरोप अजित पवारांनी भाजपवर (BJP) केले. यानंतर एरवी सगळ्यांवर तुटून पडणारे भाजप नेत्यांकडून लगेच या टीकेला प्रत्युत्तर दिले जाणे अपेक्षित होते. मात्र, अजित पवार (Ajit Pawar) यांचा रौद्रावतार पाहून पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे स्थानिक नेते पूर्णपणे बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे.
अजित पवारांच्या आरोपानंतर स्थानिक आमदार महेश लांडगे यांच्याशी ‘एबीपी माझा’ने वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेहमीप्रमाणे त्यांनी फोन उचलणं टाळलं. तसेच आमदार शंकर जगताप यांना विचारले असता त्यांनी, मी प्रचारात व्यस्त आहे, असा निरोप त्यांच्या फोनवरून समर्थकाद्वारे दिला. तर शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी उद्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आमच्या प्रचाराचा नारळ फोडायला येणार आहेत. त्यावेळी तेच अजित पवारांच्या आरोपांवर उत्तर देतील, असे सांगितले. ही एकूणच परिस्थिती पाहता अजित पवार यांच्या घणाघाती टीकेमुळे भाजपचे स्थानिक आमदार आणि शहराध्यक्षांची बोलती बंद झालीये का? किंबहुना अजितदादांच्या दराऱ्याला ते घाबरत आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अजित पवारांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
यावेळी अजित पवार यांनी गुंड निलेश घायवळ याच्या परदेशातील पलायनप्रकरणात भाजपचे पुण्यातील खासदार मुरलीधर मोहोळ यांना लक्ष्य केले. एका व्यक्तीला परदेशात जायला कोणी मदत केली? त्याला पासपोर्ट कोणी दिला? तो कसा पळाला? त्यांनी सुद्धा गेल्या काही वर्षात कोणाकोणाला कशी उमेदवारी दिली, याची पण माहिती काढा, अशी सूचक टिप्पणी अजित पवार यांनी केली.










































