वर्षानुवर्षें खुर्च्या उबवूनही गावासाठी काहीच न केलेल्यांना घरी बसवा – संदीप वाघेरे यांचे आवाहन

0
5

पिंपरी :वर्षानुवर्षे खुर्च्या उगवूनही पिंपरी गावासाठी काहीच न केलेल्या मंडळींना घरी बसवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी गाव प्रभाग क्रमांक 21 चे उमेदवार संदीप वाघेरे यांनी येथे केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपरी गावातील प्रभाग क्रमांक 21 मधून संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे व निकिता कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पॅनलच्या निवडणूक कचेरीचे उद्घाटन आज झाले. त्यावेळी वाघेरे बोलत होते. यावेळी डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे व निकिता कदम, माजी नगरसेविका गिरीजा कुदळे, सुनिता वाघेरे मीनाताई नाणेकर, आदी उपस्थित होते.

यावेळी संदीप वाघेरे यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विविध विकास कामांचा धावता आढावा घेतला . यापेक्षाही अधिक पटीने पिंपरी गावचा विकास करायचा असेल तसेच राहिलेली विकास कामे पूर्ण करायची असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण पॅनेलला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. आम्हाला फक्त तुमचे पंधरा दिवस द्या,पुढील पाच वर्षे तुमच्यासाठी देऊ अशी भावनिक साद त्यांनी यावेळी घातली. काही मंडळींनी वर्षानुवर्ष खुर्च्या उबवल्या पण पिंपरी गाव साठी काहीच केले नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली. स्वच्छ सुंदर आणि पिंपरी चिंचवड शहरात आदर्श ग्राम म्हणून पिंपरी गावचे नाव आपल्याला करायचे आहे. आमच्या या संकल्पाला आपली साथ द्या असे आवाहन त्यांनी केले.

माजी नगरसेविका सुनिता वाघेरे म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवडचा विकास केला. पिंपरीतील जिजामाता रुग्णालय तसेच शंभर फुटी रस्ता हे त्यांच्याच प्रेरणेतून आणि पाठिंब्याने झाले. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला विजयी करण्याचे आवाहन वाघेरे यांनी केले.

गिरीजा कुदळे म्हणाल्या की, संदीप वाघेरे यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम केले. पिंपरी गावच्या विकासाची अनेक कामे केली. भाजपने महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे त्याला उत्तर देण्यासाठी संदीप वाघेरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पॅनेलला विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

मीना नाणेकर म्हणाल्या की, अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडचा विकास केला. संदीप वाघेरे यांनी पिंपरी गावच्या विकासासाठी मोठे योगदान दिले. मंदिरांचा जिर्णोद्धार केला. विकास कामेही केली असा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला.