म्हणून पिंपरी-चिंचवडला युती तुटली…

0
12

दि.३१(पीसीबी)-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना (शिंदे) पक्षाची युतीसाठीची सुरु असलेली चर्चा उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे अडीच तास शिल्लक असताना फिसकटली. परिणामी, शिवसेना (शिंदे) पक्षाच्या उमेदवारांची ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास धावपळ उडाली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) सोबत घेऊन भाजप निवडणुकीला सामोरे जाणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (शिंदे) आणि रिपाइं हे तीन पक्ष महायुतीमध्ये एकत्रित लढण्याबाबत बोलणी सुरू होती. शिवसेनेने भाजपकडे २९ जागांची मागणी केली होती. पहिल्या बैठकीत १६, त्यानंतर १३ जागा देण्याबाबत चर्चा झाली. सोमवारी शेवटच्या बैठकीत दहा जागांची मागणी केली. परंतु, याबाबत सकारात्मक चर्चा झाली नाही. इच्छुकांनी अर्ज दाखल केल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. प्रभाग क्रमांक २३ आणि २४ येथील जागांवरून पेच निर्माण झाल्याने युती फिसकटल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपने रिपाइंला पाच जागा दिल्या असून ते उमेदवार कमळ चिन्हावर निवडणूक लढणार आहेत.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, शिवसेना (शिंदे) – भाजप पक्षाची पारंपारिक युती आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत युती व्हावी यासाठी मी पुढाकार घेतला होता. शहराध्यक्ष, आमदारांशी संपर्क साधला. सातत्याने बैठकीचे सत्र सुरु होती. भाजपकडे २९ जागांची मागणी केली होती. पहिल्या बैठकीत १६, त्यानंतर १३ जागा देण्याबाबत चर्चा झाली. सोमवारी शेवटच्या बैठकीत दहा जागांची मागणी केली. परंतु, याबाबत सकारात्मक चर्चा झाली नाही. दुपारपर्यंत आमदार शंकर जगताप यांच्या संपर्कात होतो. परंतु, कार्यकर्ते ऐकत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ऐनवेळी निर्णय झाला. युती फिसकटल्याचे वाईट वाटत आहे. २०१७ मध्येही ऐनवेळी दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. पण, संबंधांमध्ये कटुता आली नाही. स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. टीका-टिप्पणी, रोष, आरोप करणार नाही.

साडेबारा वाजता युती तुटल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अर्ज कमी भरले गेले आहेत. भाजपशी मित्रत्वाचे संबंध असून कायम राहतील. निवडणुका येतात, जातात. भाजप-शिवसेना (शिंदे) पक्ष केंद्रात, राज्यात एकत्र आहे. त्यामुळे संबंध जिव्हाळ्याचे राहतील. युती व्हावी यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सहकार्य केले. परंतु, स्थानिक पातळीवर एकमत झाले नाही. त्यामुळे हे सर्व घडले आहे. कार्यकर्त्यांना न्याय देणे प्रत्येक पक्षाचे कर्तव्य असते. कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी स्वबळावर निवडणूक लढविणार आहोत, असेही खासदार श्रीरंग बारणे यांनी स्पष्ट केले.