दि.३०(पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्याने बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर न करता निश्चित केलेल्या उमेदवारांना निरोप देऊन अर्ज भरण्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे पक्षाकडून निरोप आलेल्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. शेवटच्या काही तासांत अधिकृत उमेदवारांचे एबी अर्ज थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडे दिले जाणार असल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (मंगळवारी) शेवटचा दिवस आहे. सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेत अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्ज भरण्यास काही तास उरले असतानाही कोणत्याही पक्षाने अधिकृत उमेदवार जाहीर केले नाहीत. बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच पक्षांकडून काळजी घेतली जात आहे. भाजपचे निवडणूकप्रमुख आमदार शंकर जगताप यांनी रविवारी उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. परंतु, बंडखोरीच्या शक्यतेने त्यांनी यादी जाहीर करणे टाळले.
उमेदवारांची पळवापळवी?
भाजपकडे काही प्रभागांमध्ये चारपेक्षा अधिक इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे एकाला उमेदवारी दिल्यास नाराज झालेला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नाराजही उमेदवारी नाकारल्यास भाजपकडून अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. उमेदवारीअर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून, या दोन्ही पक्षांकडून उमेदवारांची पळवापळवी होण्याची शक्यता आहे.
भाजपचे सर्व उमेदवार निश्चित झाले आहेत. उमेदवारांना मंगळवारी सकाळी ‘एबी फॉर्म’ दिला जाणार आहे, असे भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले. भाजपने शंभर, सव्वाशे जागा निवडून आणण्याच्या डरकाळ्या फोडल्या. पण, उमेदवार जाहीर करता आले नाहीत. भाजप उमेदवार जाहीर करण्यास घाबरत असून, त्यांच्यामध्ये घबराट निर्माण झाली आहे. पक्षाच्या उमेदवारांना उद्या सकाळी ‘एबी फॉर्म’ दिला जाणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सांगितले










































