कार्यकर्त्यांच्या प्रेरणेचे केंद्र ठरणाऱ्या ‘शक्तिस्थळ’चे १ जानेवारीला लोकार्पण- आमदार शंकर जगताप

0
5

दि.३०(पीसीबी)-पिंपरी-चिंचवडच्या इतिहासात एक भावनिक व अभिमानाचा क्षण नोंदवला जाणार आहे. प्रेरणा, निष्ठा, सामर्थ्य, सेवाभाव आणि दातृत्वाचे प्रतीक असलेले लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या ‘शक्तिस्थळ’ या प्रेरणा केंद्राचे भव्य लोकार्पण गुरुवार, दि. १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता पिंपळे गुरव गावठाण येथील मारुती मंदिराजवळ होणार आहे.

आमदार शंकर जगताप याबाबत माहिती देताना म्हणाले, लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या दातृत्व, कर्तुत्व आणि नेतृत्वाची ख्याती सर्वश्रुत आहे. पिंपरी चिंचवड शहराला अत्याधुनिक शहर बनवण्याचा त्यांचा ध्यास होता. नाविन्यपूर्ण गोष्टी शहरासाठी उपयोगात येतील यावरच त्यांचा नेहमी भर असायचा. लक्ष्मणभाऊंच्या कार्याचा वारसा आणि भावी पिढ्यांना दिशा देणारी प्रेरणा यांचा संगम साधत हे शक्तिस्थळ उभारण्यात आलेले आहे.  हे शक्तिस्थळ केवळ स्मारक नसून, सेवाभाव, निष्ठा आणि कर्तव्याची जिवंत शिकवण ठरणार आहे. आयुष्यभर सर्वसामान्य माणसासाठी झटणाऱ्या भाऊंच्या विचारांना येथे कायमस्वरूपी जतन केले जाणार आहे.

‘शक्तिस्थळ’  लोकार्पण करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपस्थिती राहणार आहेत.  केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री  मुरलीधर अण्णा मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, माधुरीताई मिसाळ, राज्याचे मंत्री डॉ. प्रा. तानाजीराव सावंत, माजी आमदार श्रीमती अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप, पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक  विजयजी रेणुसे तसेच विजय पांडुरंग जगताप यांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभणार आहे. लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवार यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

असे असेल शक्तिस्थळ

15 गुंठे जागेमध्ये हे शक्तिस्थळ उभारण्यात आले आहे. यामध्ये लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या आठवणींचे जतन केले गेले आहे. त्यांना मिळालेले अनेक पुरस्कार, सन्मान चिन्ह या ठिकाणी कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने संग्रहित करण्यात आले आहे . शक्तिस्थळामध्ये ग्रंथालय, अभ्यासिका, ॲम्फी थिएटर यांचा समावेश आहे. अभ्यासिकेच्या माध्यमातून युवकांना यूपीएससी आणि एमपीएससीच्या अभ्यासासाठी मदत होणार आहे. या ठिकाणी चौथरा उभारण्यात आला आहे. तेथे अखंड ज्योत प्रज्वलित राहणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांचे रोपण देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहे.

पिंपरी चिंचवड शहराने स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करावे. अत्याधुनिक शहरांच्या यादीमध्ये सर्वात वरचे स्थान मिळवावे, यासाठी लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप यांचा नेहमीच पुढाकार असायचा. अत्याधुनिक सेवा, वाहतुकीचे नियोजन, पाण्याची मुबलकता,  शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या उत्तम सुविधा हेच “व्हिजन” नेहमी लक्ष्मणभाऊंनी ठेवले होते .आज तेच “व्हिजन ” शक्तिस्थळाच्या रूपात आमच्या समोर आहे . हे  आम्हाला वेळोवेळी भाऊंनी दाखवलेल्या मार्गावरून जाण्यासाठी प्रेरित करेल. आम्हा कार्यकर्त्यांचे ते शक्तिचे केंद्र ठरेल. संघर्षाच्या वाटेवर चालण्यासाठी या केंद्रातून आम्हाला नेहमीच भाऊंच्या प्रेरणेतून शक्ती मिळेल.  हे  ‘शक्तिस्थळ” लक्ष्मण भाऊंच्या आठवणींचे,  संस्कारांचे आणि निष्ठेचे चिरंतन प्रतीक ठरणार आहे.