पिंपरी, दि. २९ : भारतीय जनता पक्षातील (भाजप) लोकप्रतिनिधींच्या मुलांना, नातेवाईकांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी न देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. पुण्यातील सहा लोकप्रतिनिधींकडून नऊ जणांना तर पिंपरी-चिंचवडमधील लोकप्रतिनिधींकडून दोघांना उमेदवारी देण्याचा घाट घालण्यात आला होता. राज्यात हा आकडा १००हून अधिक असल्याने भाजपमधील संभाव्य घराणेशाहीला वेळीच आळा घातल्याची चर्चा आहे.
आमदार खापरेंच्या मुलाचे तिकीट कट
विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांचे चिरंजीव जयदिप यांनी चिंचवड किंवा प्राधिकरणातून उमेदवारी मागितली होती आणि तशी जोरदार तयारीसुध्दा केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतल्याने आता जयदिप यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. त्या प्रभागात माजी नगरसेवक शितल उर्फ विजय शिंदे यांची उमेदवारी निश्चि असल्याचे समजले.
आमदार अमित गोरखे यांच्या मातोश्री माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, आमदार महेश लांडगे यांचे धाकटे बंधू सचिन लांडगे यांनी भाजपमधून उमेदवारी मागितली आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या संजोग वाघेरे यांनी त्यांची पत्नी उषा वाघेरे किंवा मुलगा ह्रषिकेश यांनी उमेदवारी मागितली आहे. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा मुलगा विश्वजीत बारणे याचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माजी महापौर मंगला कदम यांच्या मुलाने कुशाग्र याने भाजप प्रवेश केला त्यांना उमेदवारी मिळाली आहे. माजी महापौर आझम पानसरे यांचा मुलगा निहाल याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला असून त्याची उमेदवारी निश्चित समजली जाते.
पुणे शहरात भाजपचा गोंधळ –
पुण्यातील लोकप्रतिनिधींकडून आपल्या मुलांना, घरातील व्यक्तींना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी मागण्यात येत होती. भाजपमध्ये या उमेदवारीवरून खदखद व्यक्त होत होती. मुख्यमंत्री फडणवीस तसेच राष्ट्रीय सहसंघटन सरचिटणीस शिवप्रकाश यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत उमेदवारीबाबत पडसाद उमटले होते. या बैठकांनंतर अवघ्या ४८ तासांत वाढत्या घराणेशाहीला थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांना त्यांचे पुतणे अभिषेक यांच्यासाठी उमेदवारी हवी आहे. पक्षाच्या या निर्णयामुळे त्यांच्या संभाव्य उमेदवारीवर गंडांतर येण्याची दाट शक्यता आहे. तापकीर यांच्या भावजय माजी नगरसेविका वर्षा या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. वर्षा तापकीर या महापालिकेवर तीनदा निवडून गेल्या असून यंदा चौथ्यांदा त्या निवडणुकीच्या रिंगणात असतील. महापालिकेत त्यांनाही कुठलेही लाभाचे पद मिळालेले नाही. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र हे भाजपवासी झाले असून त्यांनाही उमेदवारी देण्यात येणार आहे. बापू पठारे हे ‘राष्ट्रवादी’मध्ये असल्याने सुरेंद्र यांना उमेदवारी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
बापट, टिळक यांच्याही उमेदवारीचे काय-
खासदार मोहोळ यांचे चूलत बंधू श्रीधर मोहोळ यांच्या कुटुंबात उमेदवारी देण्याचे घाटत आहे. त्यांना ज्या प्रभागात उमेदवारी देण्यात येणार आहे, तेथे तुल्यबळ उमेदवार नसल्याने त्यांना उमेदवारी मिळू शकते, असा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड येथील भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या घरातील उमेदवारी थांबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. दरम्यान, माजी खासदार दिवंगत नेते गिरीश बापट तसेच माजी आमदार दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात या निवडणुकीत उमेदवारी देण्यात येणार असल्याचे समजते.












































