दि.२८(पीसीबी)- राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्यापासून राजकीय हालचालींना वेग आला आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच युती आणि आघाडीच्या चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. अशातच पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीत मोठी बिघाडी झाल्याची माहिती समोर आली आहे.
आज पुण्यात शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची जागावाटपासाठी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्यांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत आघाडीची घोषणा केली आहे.
या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते अनुपस्थित राहिल्याने ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये स्वतंत्र चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या गैरहजेरीबाबत वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली. यावर खासदार संजय राऊत यांनी, “कोणाची वाट पाहू नका, पुढे जा,” अशी स्पष्ट सूचना केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार ठाकरे गट आणि काँग्रेसने पुण्यात एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात बोलताना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे म्हणाले की, “मागील बैठकीत राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. मात्र कालपासून ते नॉट रिचेबल आहेत. फोन लावूनही संपर्क होत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीची चर्चा करण्याची मानसिकता नसल्याचा निष्कर्ष आम्ही काढला आणि काँग्रेससोबत जागावाटपाची प्रक्रिया सुरू केली. आता ते पुन्हा आले तरी वेळ निघून गेला आहे.”
दरम्यान काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले की, “आज सकाळपासून आम्ही बैठकीत बसलो आहोत. राष्ट्रवादीच्या नेत्यांना निरोप दिला होता, पण ते आले नाहीत. तरीही काल ठरवलेल्या जागा आजही तशाच ठेवल्या आहेत. १६५ जागांची आमची यादी तयार आहे. काँग्रेस आणि ठाकरे गट पुण्यात ताकदीने निवडणूक लढवणार आहेत.”या घडामोडींमुळे पुणे महापालिकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.










































