प्रभाग क्रमांक १० मध्ये भाजप विरोधात श्रमिक एकता महासंघाचाय उद्रेक

0
17

माजी उपमहापौर केशव घोळवे यांचा पत्ता कट केल्याने कामगारांची भाजपविरोधात नाराज

दि.२७(पीसीबी)-श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार, भाजपचे कामगार नेते आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर केशव घोळवे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यासाठी श्रमिक एकता महासंघाच्या वतीने आज शहरात पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी भाजपकडून केशव घोळवे यांचे तिकीट कापण्यात आल्याचा तीव्र निषेध करत, हा निर्णय म्हणजे संपूर्ण कामगार वर्गावर अन्याय असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी अध्यक्ष – किशोर सोमवंशी, जनरल सेक्रेटरी रोहित पवार, प्रमुख सल्लागार मारुतीराव जगदाळे, दिलीपराव पवार तसेच श्रमिक एकता महासंघातील इतर संलग्न संघटनांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेमध्ये महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, केशव घोळवे हे गेली २५ वर्षे पिंपरी चिंचवड शहरात कामगार चळवळीचे एक निस्वार्थ, प्रामाणिक आणि लढवय्ये नेतृत्व म्हणून ओळखले जातात. श्रमिक एकता महासंघाचे माजी महासचिव व विद्यमान सल्लागार म्हणून त्यांनी शोषित, पीडित, वंचित, असंघटित, संघटित तसेच सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्त कामगारांच्या न्यायहक्कासाठी सातत्याने संघर्ष केला आहे. ऊसतोड कामगारांच्या कुटुंबातून आलेल्या या नेत्याने स्वतःचे जीवन कष्टकऱ्यांच्या सेवेसाठी अर्पण केले आहे.

थरमॅक्स कामगार संघटनेत सलग तीन वेळा अध्यक्षपद भूषवताना त्यांनी कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या, तसेच सर्वोच्च वेतन करार करून कामगारांच्या आर्थिक सुरक्षिततेला बळ दिले. श्रमिक एकता महासंघाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील अनेक कामगार संघटनांना त्यांनी मार्गदर्शन व पाठबळ दिले.

२०१७ साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांच्या आशीर्वादाने व सहकार्याने केशवराव घोळवे यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली होती. त्या वेळी कामगार संघटनांनी एकजुटीने त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून महापालिकेच्या सभागृहात कष्टकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून पाठवले होते.

नगरसेवक व उपमहापौर म्हणून काम करताना त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महा मेट्रो, भामा आसखेड व आंध्र धरणातून पाणीपुरवठा, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, वाय.सी.एम. रुग्णालयात स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय, पीएमपीएमएलच्या वातानुकूलित ई-बस सेवा, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत हजारो गोरगरिबांना घरकुल अशा अनेक महत्त्वाकांक्षी योजनांसाठी पुढाकार घेतला. तसेच प्रभाग १० मध्ये दिव्यांग भवन, शाहू-फुले-आंबेडकर सृष्टी, वस्ताद लहुजी साळवे स्मारक, अण्णासाहेब पाटील स्मारक, काँक्रीट रस्ते, मोरवाडी स्मशानभूमी नूतनीकरण, बर्ड व्हॅली लेझर शो, वॉटर फाउंटन शो, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, उद्यानांतील ओपन जिम, स्मार्ट सिटी अंतर्गत पाथवे व विद्युतीकरण, सायन्स पार्क, तारांगण, नवीन ड्रेनेज व पाणीपुरवठा लाईन्स अशी अनेक विकासकामे त्यांनी मार्गी लावली.
कोरोना महामारीच्या काळात त्यांनी २४x७ सेवा देत हजारो रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना मदत केली. सफाई कामगार, स्मशानभूमी कर्मचारी, पॅरामेडिकल स्टाफ, आशा वर्कर, बालवाडी सेविका, कंत्राटी कामगार, पीएमपीएमएल व मेट्रोतील कर्मचारी यांच्यासाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला, असेही यावेळी नमूद करण्यात आले.

असे असतानाही “हे नेतृत्व खूप मोठे होऊ शकते” या भीतीपोटी केशव घोळवे यांचे तिकीट कापण्यात आल्याचा आरोप महासंघाने केला. श्रमिक एकता महासंघाचे शहरातील दीडशे कंपन्यांमध्ये सुमारे ३५ हजार सदस्य असून कुटुंबांसह ही संख्या सुमारे १ लाख ४० हजारांपर्यंत जाते. त्यामुळे केशवराव घोळवे यांच्यावर झालेला अन्याय म्हणजे संपूर्ण कामगार वर्गावर झालेला अन्याय असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर महासंघाने भाजपचा जाहीर निषेध करत शहरातील तमाम कामगार बांधवांना आणि भगिनींना आवाहन केले की, पैशाच्या जोरावर व गुंडशाहीच्या बळावर उभे राहिलेल्या उमेदवारांना त्यांची जागा दाखवा. “पूर्वीची अटल-आडवाणी-मुंडे यांची भाजप राहिलेली नाही,” असा आरोप करत, घराणेशाही आणि संधीसाधूपणाविरोधात मतदानातून चपराक देण्याचे आवाहनही करण्यात आले.

श्रमिक एकता महासंघाच्या या भूमिकेमुळे पिंपरी चिंचवडच्या राजकारणात खळबळ उडाली असून, येत्या निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.