एक दिवसीय प्रशिक्षणात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना कायदेशीर नियमावली व ईव्हीएम यंत्राचे प्रात्यक्षिक
दि.२७(पीसीबी)-लोकशाही प्रक्रियेत मतदान हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनावर नागरिकांचा विश्वास अबाधित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी निवडणूक काळात केवळ मतदानाच्या दिवशी पुरते आपले कार्य मर्यादित नसून, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर दक्ष राहणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणात सर्व शंकांचे निरसन करून, आत्मविश्वासाने निवडणूक कामकाज पार पाडा, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी केले.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात महापालिका सार्वत्रिक निवडणुक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रारंभिक प्रशिक्षण पार पडले. यावेळी मार्गदर्शन करतांना अतिरिक्त आयुक्त बगाडे बोलत होते.
तीन सत्रात पार पडलेल्या या प्रशिक्षणामध्ये प्रथम सत्रात चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात संगणकीय सादरीकरणाद्वारे मतदान प्रक्रियेचे सविस्तर प्रशिक्षण अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आले. तर द्वितीय सत्रात प्रात्यक्षिकाद्वारे ईव्हीएम हाताळणीचे प्रशिक्षणही अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आले. या प्रशिक्षणास अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, उपायुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य प्रशिक्षक सतीश मेहेर, अविनाश वाळुंज, रामेश्वर पवार, नरेंद्र बंड यांच्यासह संबंधित समन्वय अधिकारी तसेच मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सह आयुक्त मनोज लोणकर म्हणाले, निवडणूक कामकाजात पारदर्शकता व शिस्त अत्यंत महत्त्वाची आहे. मतदान केंद्रावर मतदार ओळख प्रक्रिया, गोपनीयतेची अंमलबजावणी व आचारसंहितेचे पालन याबाबत तसेच मतदानाच्या दिवशी उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी व त्यावरील उपाययोजनांची सविस्तर माहिती सर्वांनी करून घ्यावी. तसेच मतदानानंतरची कागदपत्रे, अहवाल सादरीकरण व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय कसा ठेवावा यावरही भर देऊन सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने व दक्षतेने काम करून निवडणूक प्रक्रिया यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
उप आयुक्त पंकज पाटील म्हणाले, पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक ही लोकशाहीची अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून ती यशस्वी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावर आहे. मतदान केंद्रावर होणारी प्रत्येक कृतीची नियमानुसार नोंद होणे आवश्यक आहे. शिस्त, शांतता आणि निष्पक्षता या निवडणूक प्रक्रियेच्या मूलभूत बाबी असून त्यांचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे. कोणतीही चूक किंवा निष्काळजीपणा टाळून प्रत्येक टप्प्यावर दक्षतेने काम केल्यास व निवडणूक कायदे आणि मार्गदर्शक सूचनांची अचूक अंमलबजावणी केल्यास नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होईल.
ईव्हीएम मशीनचे मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना प्रात्यक्षिक
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक ईव्हीएम मशीनद्वारे घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशिक्षणाच्या दुसऱ्या सत्रात निवडणूक प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम यंत्रांची रचना, कंट्रोल युनिट व बॅलेट युनिटची कार्यपद्धती याबाबत मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे सविस्तर माहिती देण्यात आली. मतदान सुरू होण्यापूर्वी मॉक पोल घेण्याची अचूक प्रक्रिया, मतदानादरम्यान उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींवर तत्काळ उपाययोजना तसेच मतदान संपल्यानंतर ईव्हीएम यंत्रे सुरक्षितरीत्या सील करून सुपूर्द करण्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या ईव्हीएम प्रात्यक्षिक सत्रासाठी आयटीआयचे जितेंद्र काथवटे, अरुण बांबळे, प्रवीण कोळेकर, योगेश गरड, किशोर शिंदे, संजीव आनंदकर, गणेश सुर्वे, शिवदास वाघमारे, जयवंत अनपट आणि अमोल शिंदे यांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.









































