ठाण्यात भाजपचा स्वबळाचा डाव! मोदींच्या बॅनरनंतर संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

0
5

दि.२७(पीसीबी)-महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी असोत किंवा विरोधक, सर्वच पक्षांनी निवडणूक रणधुमाळीची तयारी अंतिम टप्प्यात आणली असून जागावाटप आणि उमेदवारीच्या चर्चांना वेग आला आहे. अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.

या सगळ्यात देशाचं लक्ष लागलेली मुंबई महापालिका निवडणूक यंदा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मुंबई जिंकण्याचा निर्धार भाजपने केल्याचं स्पष्ट दिसत असून, त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युती होण्याची चिन्हे आहेत. मात्र याचवेळी ठाण्यात भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचं चित्र दिसत आहे.

ठाण्यातील कापूरबावडी जंक्शन आणि तीन हात नाका परिसरात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य बॅनर लावून प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. “नमो भारत, नमो ठाणे” असा उल्लेख असलेले हे बॅनर कमळाच्या चिन्हासह सर्वत्र झळकत आहेत.याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना मोठा दावा केला आहे.

“भाजपला ठाण्यात एकनाथ शिंदे यांचा पराभव करायचा आहे, एवढंच मला माहीत आहे. आणि त्यादृष्टीनेच भाजप तयारी करत आहे,”
असं म्हणत राऊत यांनी थेट भाजपच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.राऊत पुढे म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे गणित वेगळे होते, मात्र आता भाजप विरुद्ध शिवसेना-मनसे युती अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एकीकडे ठाण्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना, दुसरीकडे मुंबईतील शिवसेना भवनासमोर उत्तर भारतीयांकडून आक्रमक बॅनरबाजी करण्यात आली आहे.सटोगे तो बचोगे, वरना बटोगे तो पिटोगे असा मजकूर असलेल्या या बॅनरमुळे निवडणुकीआधीच नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

“हे भाजपचे धंदे आहेत. कुणी निंदा, कुणी वंदा – माझं नाव धंदा, तसंच यांचं सुरू आहे. खुनी, बलात्कारी, भ्रष्टाचारी लोक हीच त्यांची ताकद आहे,”
अशा तीव्र शब्दांत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सुरू झालेल्या या घडामोडींमुळे ठाणे आणि मुंबईतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.