दि.२७(पीसीबी)-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना (शिंदे) पक्षाच्या युतीची चर्चा सुरू असतानाच खासदार श्रीरंग बारणे यांचे चिरंजीव विश्वजित बारणे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग क्रमांक २४ मधील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या (ओबीसी) जागेसाठी बारणे यांनी दोन अर्ज भरले आहेत. इतर सात उमेदवारांनीही शुक्रवारी अर्ज दाखल केले आहेत.
महापालिकेच्या ३२ प्रभागातील १२८ जागांसाठी १५ जानेवारी रोजी निवडणूक हाेणार आहे. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. अर्ज भरण्यास अवघे तीन दिवस राहिले असतानाही एकाही पक्षाने उमेदवार जाहीर केले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) पक्षा सोबत आघाडी करण्याची बोलणी सुरू आहे. भाजपची शिवसेना (शिंदे) पक्षासोबत युतीची चर्चा सुरु आहे. भाजपने नऊ जागा देण्याची तयारी दर्शविली असून शिवसेना १६ जागांवर ठाम आहे. त्यामुळे युतीची घोषणा होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत असल्याने उमेदवारी निश्चित असलेल्या इच्छुकांनी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना (शिंदे) पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे यांचे चिरंजीव विश्वजित बारणे यांनी प्रभाग क्रमांक २४ गणेशनगर, म्हातोबानगर, पद्मजी पेपर मिल, बिर्ला रुग्णालय, साई कॉलनी, पडवळनगर, महाराष्ट्र कॉलनी, गुजरनगर, बेलठिकानगरमधून अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक १७ मधून भाजपकडून दिलीप गोसावी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून राजेंद्र साळुंके, शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून राहुल पालांडे आणि सचिन सिद्धे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. प्रभाग तीनमधून ज्ञानेश्वर बोराटे यांनी अपक्ष, प्रभाग क्रमांक चारमधून भाजपकडून उदय गायकवाड आणि प्रभाग २१ मधून अब्दुल शेख यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.









































