भाजप निष्ठावंतांना डावलून आयारामांना प्रवेश दिल्याने भाजप आमदारांच्या डोळ्यात पाणी

0
63

दि.२६(पीसीबी)-भाजपचे संस्थापक माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी जयंतीदिनी यांच्या दिग्गजांच्या प्रवेश सोहळ्यावरून भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयाबाहेर बुधवारी  अभूतपूर्व राडा पाहायला मिळाला. भाजपचे पांरपरिक विरोधक असलेले प्रभाग क्र. १३ मधील काँग्रेसचे माजी गटनेते उबाठाचे माजी महापौर विनायक पांडे, अॅड. यतीन वाघ यांच्या प्रवेशाला निवडणूकप्रमुख आमदार देवयानी फरांदे यांच्यासह समर्थकांनी विरोध केल्याने निष्ठांवत विरुद्ध आयारामांचा थेट संघर्ष पाहायला मिळाला. आमदार फरांदे यांच्या डोळ्यात पाणी आल्याने निष्ठावंत गहिवरले.

विरोधानंतरही प्रवेशसोहळा झाल्याने निष्ठावंतांनी दिलेल्या ‘धिक्कारा’च्या घोषणा, तर नव्या प्रवेशकत्यांच्या ‘आगे बढो’च्या घोषणांनी ‘वसंतस्मृती’ कार्यालय दणाणून गेले. निष्ठावंत विरुद्ध आयारामामधील संघर्षामुळे चक्क पोलिस बंदोबस्तात कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांना निवडणूक प्रमुखांच्या अनुपस्थितीत प्रवेशसोहळा उरकावा लागल्याने भाजपची फजिती झाल्याचे पाहायला मिळाली. महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना भाजपविरोधात एकीची मोट बांधणाऱ्या महाविकास आघाडीला भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनी सुरुंग लावला.

भाजप कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या या राड्यातच मंत्री महाजन यांची पोलिस बंदोबस्तात एंट्री झाली. महाजन कार्यालयाच्या प्रवेशद्वार आल्यानंतर विरोधकांनी त्यांना गेटवरच अडवत निष्ठावंतांना कधी न्याय देणार, असा सवाल केला. या वेळी महाजन यांना घेराव घातला गेला. महाजन आणि निष्ठांवतांमध्ये तू-तू-मै-मै झाल्याचे चित्र होते. गर्दीमुळे महाजन यांनाही रेटारेटीतच आणि आमदार राहुल ढिकले आणि सुधाकर बडगुजरांच्या मदतीने कसाबसा प्रवेश मिळाला. या वेळी पोलिसांनी साखळी करत महाजनांना कार्यालयात नेले.

फरांदेंना अश्रू अनावर

खैरे, वाघ, पांडे यांच्या प्रवेशाविरोधात पक्ष कार्यालयात आंदोलन सुरू असताना आमदार फरांदे यांनी हॉटेलमध्ये जाऊन मंत्री गिरीश महाजनांची भेट घेतली. या प्रवेशावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली. निवडणूकप्रमुख असतानाही मला न विचारता प्रवेश ठरल्याबाबत त्यांनी विचारणा केली. परंतु, संबंधित प्रवेश होणारच असल्याच्या भूमिकेवर महाजन ठाम राहिल्यानंतर नाराज होऊन हॉटेलबाहेर पडलेल्या आमदार फरांदे यांना अश्रू लपविता आले नाहीत. त्यामुळे त्यांनी प्रवेश सोहळ्यालाही उपस्थित न राहता निवासस्थान गाठल्याने भाजपमधील बेदिली पुन्हा समोर आली आहे.