दि.२६(पीसीबी)-आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला पुण्यात अजित पवार यांच्यासोबत लढता येणार नाही. तसे केल्यास विरोधकांचा फायदा होईल, असे सांगत अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्यास नकार दिला होता. त्यानंतर आता शिंदे गटही पुण्यात भाजपची साथ सोडेल, अशी चिन्हं दिसत आहेत. भाजपकडून जागावाटपात सन्मानजनक जागा सोडल्या जात नसल्याने शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांनी हा इशारा दिला आहे. शिवसेनेला पुण्यात भाजपकडून सन्मानजक जागांची अपेक्षा आहे. मात्र, भाजपकडून काहीच उत्तर आलं नाही तर शिवसेना योग्य निर्णय घेईल. एकनाथ शिंदे याबाबत अंतिम निर्णय घेतील, असे नीलम गोऱ्हे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
पुणे महानगरपालिकेत एकूण 41 प्रभाग असून नगरसेवकांची संख्या 165 इतकी आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या जागावाटपात भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अवघ्या 12 जागांची ऑफर देण्यात आली आहे. शिंदे गटाने भाजपकडे 35 जागांची मागणी केली होती. मात्र, भाजप पुण्यात एकहाती सत्ता मिळवण्याच्या इर्ष्येने मैदानात उतरल्याने त्यांनी शिंदे गटाला मागणी केलेल्या जागांच्या फक्त निम्म्या जागा सोडण्याची तयारी दाखवली आहे. याबाबत शिवसेनेने नाराजी व्यक्त केल्यानंतर भाजपने 12 वरुन शिवसेनेला 15 जागा सोडण्याची तयारी दाखवली. तरीही शिंदे गट 20 ते 25 जागांसाठी आग्रही आहे. पुण्यातील शिवसेनेकडून तसा प्रस्ताव एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आला होता. यावर आता एकनाथ शिंदे साहेब अंतिम निर्णय घेतील, असे पुण्यातील शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात आले.









































