आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांची‘लिव्ह-इन रिलेशनशिप’वर टीका

0
5

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’वर टीका केली. विवाह आणि कुटुंब हा भारतीय समाजाचा पाया असून, त्याकडे केवळ वैयक्तिक सोय किंवा शारीरिक सुखाचे साधन म्हणून पाहता येणार नाही, असे मत त्यांनी मांडले आहे. पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे आयोजित आरएसएसच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. या कार्यक्रमात त्यांनी भारतीय समाज व्यवस्थेतील कुटुंबाची रचना, अपत्य, लग्नाचे वय यांसारख्या विषयांवरही आपले मत मांडले. मोहन भागवत नक्की काय म्हणाले? त्यांचे विधान चर्चेत का? जाणून घेऊयात..

कुटुंब आणि विवाहाचे महत्त्व

कुटुंब आणि विवाहाच्या महत्त्वाविषयी बोलताना मोहन भागवत म्हणाले, कुटुंब आणि विवाह हे केवळ शारीरिक समाधानाचे माध्यम नसून समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने कोलकाता येथे आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात भागवत बोलत होते. ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’बद्दल बोलताना ते म्हणाले, “वचनबद्धता नसलेले नाते हे जबाबदारीतून पळ काढण्यासारखे आहे.” ते म्हणाले. “जर कोणी जबाबदारी घेण्यास तयार नसेल, तर ते योग्य नाही.”

त्यांनी स्पष्ट केले की, कुटुंब ही अशी प्राथमिक संस्था आहे जिथे व्यक्ती समाजात कसे जगावे हे शिकतो. विवाह ही केवळ एक खाजगी व्यवस्था नसून ती सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेशी जोडली आहे, असे भागवत म्हणाले. ते म्हणाले, “जर एखाद्याला लग्न करायचे नसेल तर तो पर्याय उपलब्ध आहे. एखादी व्यक्ती संन्यासाचा मार्गही निवडू शकते. परंतु, जबाबदारी आणि शिस्त दोन्ही टाळल्यास समाज कसा चालेल, हा प्रश्न निर्माण होतो.”

लोकसंख्या आणि सामाजिक आरोग्य

लोकसंख्येच्या मुद्द्यावर बोलताना भागवत म्हणाले की, कुटुंबाचा आकार किती असावा, याचे निर्णय लादलेल्या सूत्रांऐवजी कुटुंब आणि समाजानेच घेतले पाहिजेत. डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ आणि लोकसंख्याशास्त्रज्ञांशी झालेल्या चर्चेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, तज्ज्ञांच्या मते लवकर विवाह करण्याचे आणि मोठे कुटुंब असण्याचे परिणाम आरोग्य आणि सामाजिक संतुलनाच्या दृष्टीने चांगले असतात. अधिक मुले असल्यास लोकांचा अहंकार व्यवस्थापन करण्यास मदत होते,” असे त्यांना मानसशास्त्रज्ञांनी सांगितल्याचे ते म्हणाले. तर लोकसंख्याशास्त्रज्ञांनी इशारा दिला की, सततचा कमी जन्मदर दीर्घकालीन धोके निर्माण करू शकतो. असेही त्यांनी सांगितले.

भारताचा सध्याचा प्रजनन दर हा ‘रिप्लेसमेंट लेव्हल’च्या (लोकसंख्या स्थिर राहण्यासाठी आवश्यक दर) आसपास आहे असे सांगूत भागवत म्हणाले की, अनेक राज्यांमध्ये हा दर त्यापेक्षाही खाली गेला आहे. मात्र, मी कोणतेही धोरण सुचवत नसून, केवळ तज्ज्ञांकडून मिळालेली माहिती मांडत आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसंख्येकडे एक आव्हान आणि संधी अशा दोन्ही दृष्टिकोनातून पाहत त्यांनी ५० वर्षांचा विचार करून दीर्घकालीन नियोजनाची गरज असल्याचे म्हटले. लोकसंख्या धोरण आखताना पर्यावरणाचे रक्षण, पायाभूत सुविधा, महिलांचे आरोग्य आणि देशाच्या व्यापक गरजांचा विचार व्हायला हवा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसंख्येचे महत्त्व

कुटुंब ही समाजातील प्रत्येक व्यक्तीला मूल्ये आणि संस्कृती शिकवणारी महत्त्वाची संस्था आहे, त्यामुळे कुटुंब आणि विवाहाला आदर्श आणि जबाबदार भूमिकेत पाहणे आवश्यक आहे. सामाजिक प्रश्नांव्यतिरिक्त, भागवत यांनी शेजारील बांगलादेशातील अशांतता आणि त्याचा पूर्व भारतावर होणारा परिणाम यांसारख्या व्यापक राष्ट्रीय विषयांवरही भाष्य केले. सीमावर्ती भागातील हालचालींवर नियंत्रण ठेवणे आणि राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले आणि नागरिकांना एकतेचे आवाहन केले.

संघाबद्दलचे गैरसमज चुकीच्या माहितीमुळे पसरवले जात असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी लोकांना आवाहन केले की, संघासंबंधीचे मूल्यमापन हे कोणाच्या सांगण्यावरून नव्हे, तर तथ्यांच्या आधारे करावे. तसेच, त्यांनी ‘स्वदेशी’चा आग्रह धरत नागरिकांना स्थानिक वस्तूंचा वापर करणे, मातृभाषेचा प्रचार करणे, भारतात पर्यटनाचा विस्तार करणे आणि देशाच्या सांस्कृतिक व घटनात्मक मूल्यांशी अधिक सखोलपणे जोडले जाण्याचे आवाहन केले.

कुटुंब आणि संस्कृती

मोहन भागवत यांच्या मते, कुटुंब हे संस्कृती आणि अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे केंद्र आहे. कुटुंबात अनेक मूल्ये शिकली जातात, ज्यातून आपला समाज घडतो. आर्थिक बाबींचे व्यवस्थापनही कुटुंबातूनच सुरू होते, मग ती बचत असो वा सोने खरेदी. सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक अशा सर्वच दृष्टिकोनातून कुटुंब ही एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे.