“हा निर्णय माझ्या लोकांच्या विकासासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी…” – राहुल कलाटे

0
7

दि.२३(पीसीबी) -पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात आज एक निर्णायक घडामोड घडली असून, शहरातील मातब्बर नेते, महापालिकेतील माजी गटनेते व माजी नगरसेवक राहुल तानाजी कलाटे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.राहुल कलाटे यांच्यासोबत असलेल्या माजी नगरसेवकांनी यापूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केला होता, परंतु कलाटे यांच्या प्रवेशाकडे संपूर्ण शहरवासियांचे लक्ष होते. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, चिंचवडचे आमदार शंकर जगताप आणि भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

यावेळी बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले, “राहुल कलाटे यांच्यासारखा एक चांगला कार्यकर्ता आणि त्यांच्या सोबत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी ज्या विश्वासाने भाजपात प्रवेश केला आहे, त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही. पूर्ण ताकदीने महापालिका निवडणूक लढवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम करूया.”

यावेळी आमदार शंकर जगताप म्हणाले, “शहरातील एक तरुण तडफदार नेतृत्व भारतीय जनता पक्षात प्रवेश करत असताना मला आनंदच होत आहे. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपा अबकी बार सव्वाशे पार होईल. या प्रवेशामुळे भाजपा पिंपरी चिंचवड शहराचे मजबुतीकरण होईल. राहुल कलाटे यांचे भाजपामध्ये स्वागत करतो.”

पक्ष प्रवेशानंतर राहुल कलाटे यांनी स्पष्ट केले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम, कणखर व विकासाभिमुख नेतृत्वाखाली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी योगदान देता येईल, या विश्वासातूनच हा निर्णय घेतला आहे. लोकांची कामे व्हायला पाहिजेत हीच माझी भूमिका राहिलेली असून, यासाठी मागील २० वर्षांपासून मी संघर्ष करतोय. लोकांनी कायमच माझ्यावर विश्वास ठेवला आहे. आणि हाच विश्वास मी भाजपा नेतृत्वाकडे सोपवत आहे.”

पुढे बोलताना कलाटे म्हणाले, “पिंपरी-चिंचवडकरांनी मोठ्या कष्टातून उभारलेल्या या शहराला देश-विदेशात ओळख मिळवून दिली आहे. मात्र, शहरात काही स्थानिक समस्या अद्यापही प्रलंबित आहेत. या सर्व समस्या सोडवून प्रत्येक नागरिकाला त्याचा न्याय्य हक्क मिळवून देणे आणि सामान्य माणसाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हेच माझे प्रमुख ध्येय आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विकासासाठी काम करत राहणार!”

या पक्षप्रवेशामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाचे संघटन अधिक मजबूत होणार आहे. राहुल कलाटे यांचा प्रशासकीय अनुभव, व्यापक जनाधार, संघटन कौशल्य आणि जनतेशी थेट संवाद साधण्याची कार्यपद्धती यामुळे भाजपाला निश्चितच बळ मिळणार आहे. या प्रवेशामुळे भाजपा शत प्रतिशत कडे वाटचाल करेल असे बोलले जात आहे.

शहरातील विरोधी गटातील सर्वात मोठा प्रमुख नेता व आक्रमक चेहरा भाजपामध्ये दाखल झाल्याने भाजपासाठी स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये निर्णायक व सकारात्मक बदल घडणार असून, आगामी महापालिका निवडणुकीसाठी हा प्रवेश अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल, अशी चर्चा शहरभर सुरू आहे