ठाकरे बंधुच्या युतीची उद्या, तर पवारांच्या राष्ट्रवादी युतीची शुक्रवारी घोषणा

0
4

दि.२३(पीसीबी)-राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांच्या भूमिकांमध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत. सत्तासमीकरणे टिकवण्यासाठी आणि प्रतिस्पर्ध्यांना रोखण्यासाठी जुने मतभेद बाजूला ठेवत नेते एकत्र येत असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका ठाकरेंच्या ताब्यात राखण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने एकत्र येत घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविण्याचे ठरविले असून शुक्रवारी अधिकृत घोषणा होणार आहे.

मुंबईसाठी मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांची युती उद्या, दुपारी 12 वाजता अधिकृतपणे जाहीर होणार आहे. यानंतर आता पुणे महानगरपालिकेसाठी पवार कुटुंबातील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे “मुंबईसाठी ठाकरे, पुण्यासाठी पवार” असे चित्र महापालिका निवडणुकांमुळे तयार होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

पुणे महानगरपालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची अधिकृत माहिती स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित पवार यांनी 26 डिसेंबर रोजी दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीची अधिकृत घोषणा केली जाईल, असे स्पष्ट केले.

“कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. 26 तारखेला सर्व चित्र स्पष्ट होईल. कोण काय बोलतं, याकडे लक्ष देऊ नका,” असे आवाहन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले. या संदर्भात अजित पवार उद्या मुंबईत आढावा बैठक घेणार असल्याची माहितीही समोर आली आहे.