अखेर राहुल कलाटेंचे भाजपमध्ये स्वागत

0
37

शरद पवार यांच्या राष्ट्रवादिला रामराम, वाकड प्रभागात मोठी उलथापालाथ

पिंपरी,दि.२३-तीन वेळा चिंचवड विधानसभा निवडणूक लढविलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी आज आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. मुंबई येथील भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कलाटे आणि समर्थकांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले.

चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या १५ माजी नगरसेवकांनी भाजप प्रवेश केला आणि पाठोपाठ भाजप अंतर्गत विरोध डावलून कलाटे यांचा प्रवेश होत असल्याने राजारणात खळबळ आहे. आगामी काळात चिंचवड विधानसभेचे विभाजन होऊन दोन नवे मतदारसंघ तयार होणार असल्याने पुढचा विचार करून हा प्रवेश होत असल्याचे सांगण्यात आले. कलाटे यांच्यामुळे भाजपची शहरातील ताकद वाढली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

वाकड प्रभागातून कलाटे यांच्या मातोश्री दोन वेळा आणि स्वतः राहुल कलाटे हे दोन वेळा नगरसेवक होते. २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून तुतारी चिन्हावर निवडणूक लढवली होती. कलाटे यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडणूक लढवत विजयी उमेदवाराला आव्हान दिले होते. एकदा ठाकरेंची शिवसेना नंतर सर्व पक्षांचे अपक्ष उमेदवार आणि नंतर राष्ट्रवादी अशा तीन निवडणुकांत त्यांनी प्रथम दिवंगत लक्ष्मण जगताप, नंतर पोटनिवडणुकित नाना काटे आणि गेल्यावेळी शंकर जगताप यांच्या विरोधात लक्षवेधी मते घेतली होती. कलाटे यांनी मिळवलेले मताधिक्य आणि जनाधार शहरभर चर्चेचा विषय ठरला होता.

कलाटे यांचे अनेक समर्थक माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यापूर्वीच भाजपमध्ये दाखल झाले आहेत. वाकड प्रभाग क्रमांक २५ मध्ये या प्रवेशाचा मोठा राजकीय परिणाम होणार असून तेथील इच्छुक उमेदवारांच्या राजकीय गणितांवर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गेली अनेक वर्षे भाजप बरोबर काम कऱणाऱ्या राम वाकडकर यांच्यासह चेतन भुजबळ, विशाल कलाटे आणि सहकाऱ्यांनी कलाटे यांच्या भाजप प्रवेशाला कडवा विरोध केला होता. पत्रकार परिषद घेऊन कलाटे यांना प्रवेश दिला तर वेगळा विचार करू असा इशारा या सर्वांनी दिला होता. या घडामोडीबद्दल वाकडकर म्हणाले, पक्षश्रेष्ठीशी चर्चा करून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ.