दि.१७(पीसीबी)-फडणवीसांनी अजित पवारांशी मैत्रीपूर्ण लढू, असं म्हटलं असलं तरी पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युद्धचं करु, असा एल्गार पिंपरी-चिंचवड भाजपने केलाय. यामुळं महायुतीत कटुता निर्माण होणार हे आता उघड आहे. अजित पवारांनी भाजपचे तीन माजी नगरसेवक फोडले अन् आणखी सहा ते सात इच्छुकांच्या हाती ते घड्याळ बांधणार आहेत. आता देवा भाऊ हे बघून घेतील, असं आमदार उमा खापरेंनी अप्रत्यक्षपणे इशारा दिलाय.
तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे काही इच्छुक आमच्या संपर्कात आहेत, ते किती आहेत. हे त्यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश झाल्यावर कळेल. असं म्हणत शहराध्यक्ष शत्रुघ्न काटेंनी फोडाफोडीला फोडाफोडीने उत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे महायुतीतील दोन्ही मित्रपक्ष आता एकमेकांपुढे उभे ठाकले असून पिंपरी चिंचवडचं राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे.दुसरीकडे, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची अजित पवारांसोबत मैत्रीपूर्ण लढाई होईल, कोणतीही कटुता निर्माण केली जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना असं म्हणून 24 तास उलटायच्या आतचं अजित पवारांनी पिंपरी-चिंचवड महायुतीत कटुता निर्माण होण्याच्या दृष्टीने पावलं टाकली. शहरातील भाजपच्या तीन आणि शिंदे शिवसेनेचा एक अशा चार माजी नगरसेवकांचे पक्ष प्रवेश करुन घेत, अजित पवारांनी महायुतीच्या घटक पक्षांना पहिला धक्का दिला. बरं इथंच न थांबता अर्ज भरण्यापूर्वी भाजप आणि शिंदे शिवसेनेतील आणखी सात ते आठ इच्छुकांच्या हाती अजित पवार घड्याळ बांधणार आहेत, असा दावा शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केलाय.
महायुतीतील घटक पक्षांनी अंतर्गत फोडाफोडी करायची नाही, असं ठरलंय खरं मात्र प्रत्यक्षात अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरु केलंय. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी महायुतीत कटुता निर्माण होणार नाही असं म्हटलं असलं तरी अजित पवारांच्या या कृतीनं महायुतीत गोडवा टिकून राहील का? याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही. मात्र भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत ज्यांना असुरक्षित वाटतंय अशा इच्छुकांनी स्वतःहून राष्ट्रवादीत प्रवेश केलेत, त्यामुळं महायुतीत कटुता निर्माण होणार नाही. असा दावा बहल यांनी केलाय.












































