दि.१७(पीसीबी)-पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकिसाठी एकाच घरात दोन-तीन पक्षांकडे उमेदवारी मागण्याचा नवा फंडा सुरू झाला आहे.भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडेही एकाच कुटुंबातून उमेदवारी मागणारे असंख्य कार्यकर्ते आहेत.शहर भाजपचे मुख्य प्रवक्ते कुणाल लांडगे आहेत. कासारवाडी प्रभागातून २०१७ मध्ये त्यांनी श्याम लांडे यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती, मात्र १८०० मतांनी त्यांचा पराभव झाला. शहर भाजपने शहराचे मुख्य प्रवक्ते म्हणून कुणाल लांडगे यांच्यावर जबाबदारी सोपविली. आता त्यांचे सख्खे बंधू सतिष लांडगे हे उमेदवारीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले. सतिष लांडगे हे आमदार अण्णा बनसोडे यांचे समर्थक आहेत.
लांडगे कुटुंबातून यापूर्वी १९९२ मध्ये दशरथ लांडगे हे नगरसेवक होते. त्यांच्या नंतर कुणाल आणि सतिष असे दोघेही निवडणूक रिंगणात होते, पण त्यांना यश मिळाले नाही. आता कुणाल प्रवक्ते असून त्यांचे नाव भाजपमधून चर्चेत आहे, तर सतिष हे राष्ट्रवादीतून उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत.
माजी महापौर संजोग वाघेरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून मावळ लोकसभा निवडणूक लढविली. आता ते शिवसेनेचे शहरप्रमुख आहेत आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका उषा वाघेरे या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत, तर चिरंजीव ऋषिकेश हे भाजपच्या वाटेवर आहेत.












































