पिंपरी चिंचवडमधील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांची ठिकाणे निश्चित

0
8

दि.१६(पीसीबी)-राज्य निवडणूक आयोगकडून महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी बहुसदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार असून १५ जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली.

राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी २३ डिसेंबर २०२५ ते ३० डिसेंबर २०२५ पर्यंत कालावधी देण्यात आला असून पारंपरिक (ऑफलाईन) स्वरूपात नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहे. प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी ३१ डिसेंबर २०२५ रोजी होणार असून उमेदवारी माघारीसाठी २ जानेवारी २०२६ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी ३ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी ईव्हीएमचा वापर केला जाणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी बहुसदस्यीय पद्धतीने निवडणूक राबवली जाणार असून चार सदस्यीय प्रभागरचना असणार आहे. एकूण ३२ प्रभागांमधून १२८ जागांसाठीची निवडणूक आहे. प्रत्येक उमेदवारासाठी १३ लाख रुपये इतकी खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक मतदाराला ४ मते देण्याचा अधिकार असणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रात एकूण मतदारांची संख्या सुमारे १७ लाख १३ हजार ८९१ इतकी आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ९ लाख ५ हजार ७२८ तर स्त्री मतदारांची संख्या ८ लाख ७ हजार ९६६ इतकी आहे. तर इतर मतदारांची संख्या १९७ इतकी आहे. निवडणुकीसाठी २ हजार ४४ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. निवडणुकीसाठी ८ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांची ठिकाणे देखील निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये स्थानिक संस्था कर कार्यालय, हेडगेवार भवन, प्राधिकरण, निगडी, पुणे येथे प्रभाग क्रमांक १०, १४, १५ व १९ करिता निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय स्थापित करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक १६, १७, १८ व २२ करिता ब क्षेत्रीय कार्यालय, लिंक रोड, एल्प्रो मॉलच्या मागे, चिंचवडगाव येथे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय असणार आहे. प्रभाग क्रमांक २, ६, ८ व ९ करिता क क्षेत्रीय कार्यालय, पॉलिग्रास हॉकी स्टेडियमजवळ, एमआयडीसी, भोसरी येथे तर प्रभाग क्रमांक २५, २६, २८ व २९ करिता ड क्षेत्रीय कार्यालय, औंध–रावेत बीआरटी रोड, रहाटणे येथे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय असणार आहे. प्रभाग क्रमांक ३, ४, ५ व ७ करिता कबड्डी प्रशिक्षण संकुल, अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या मागे, भोसरी येथे तर प्रभाग क्रमांक १, ११, १२ व १३ करिता सेक्टर १७/१९, स्पाईन रोड शेजारी, घरकुल चिखली टाउन हॉल येथे व प्रभाग क्रमांक २१, २३, २४ व २७ साठी ग क्षेत्रीय कार्यालय, वेंगसरकर अकादमीच्या मागे, थेरगाव येथे आणि प्रभाग क्रमांक २०, ३०, ३१ व ३२ करिता पिंपरी चिंचवड बॅडमिंटन हॉल, पी.डब्ल्यू.डी. मैदान, सांगवी येथे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय स्थापित करण्यात आले आहे.

महापालिका सार्वत्रिक निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे, याकरिता महापालिकेसह सर्व प्रशासकीय यंत्रणांना आदेश देण्यात आले आहेत. मतदान जनजागृती कार्यक्रम देखील महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आला असून सर्व पात्र मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करावे, याकरिता जास्तीतजास्त प्रयत्न करण्यासाठी स्वीप मोहीम व्यापक करण्यात आली आहे.
……
नागरिकांना पाहण्यासाठी अंतिम मतदार यादी खालील ठिकाणी उपलब्ध आहे

महानगरपालिका मतदार यादी कक्ष : निवडणूक मतदार यादी कक्ष, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागे, पहिला मजला, मुंबई–पुणे रस्ता, पिंपरी

अ क्षेत्रीय कार्यालय : भेळ चौक, निगडी प्राधिकरण, निगडी

ब क्षेत्रीय कार्यालय : पिंपरी चिंचवड लिंक रोड, एल्प्रो मॉलच्या मागे, चिंचवडगाव

क क्षेत्रीय कार्यालय : नेहरूनगर, पॉलिग्रास ग्राउंडजवळ, एमआयडीसी, भोसरी

ड क्षेत्रीय कार्यालय : औंध–रावेत रोड, रहाटणी

इ क्षेत्रीय कार्यालय : ग्रोथलॅब इमारत, पांजरपोळ समोर, पुणे–नाशिक रोड, भोसरी

फ क्षेत्रीय कार्यालय : नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयाची जुनी इमारत, लोकमान्य टिळक चौक, निगडी

ग क्षेत्रीय कार्यालय : तिसरा मजला, ग क्षेत्रीय कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या मागे, थेरगाव

ह क्षेत्रीय कार्यालय : मुलींचे आय.टी.आय. प्रशिक्षण केंद्र, कासारवाडी