इथेनॉल मॅन आणि उद्योजक डॉ प्रमोद चौधरी मोरया गोसावी महाराज जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

0
2

चिंचवड, दि. १० – समाजातील असहिष्णुता, ताणतणाव आणि मूल्यांतील होत चाललेले क्षय पाहता शिक्षणव्यवस्थेने ‘माणूस’ घडवण्याकडे अधिक गांभीर्याने पाहिले पाहिजे, असा ठोस संदेश ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया यांनी दिला. केवळ ज्ञान आणि गुणांची स्पर्धा पुरेशी नाही; तर संवेदनशील, सहृदय आणि जबाबदार नागरिक निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षणसंस्थांवर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोरया गोसावी समाधी संजीवन सोहळ्याच्या 464 व्या महोत्सवाच्या निमित्ताने आज चिंचवड येथील मोरया मंदिर परिसरात झालेल्या या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. सुरुवातीला विश्वस्त मंडळातर्फे अभय फिरोदिया यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी व्यासपीठावर चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, जितेंद्र देव, ॲड. राजेंद्र उमाप, ॲड. देवराज डहाळे, केशव विद्वांस, माजी महापौर अपर्णा डोके, माजी नगरसेवक विजय उर्फ शीतल शिंदे, अश्विनी चिंचवडे, विठ्ठल भोईर, मोरेश्वर शेडगे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

फिरोदिया यांनी बदलत्या सामाजिक प्रवाहाचा सविस्तर वेध घेत, आधुनिक जीवनशैलीमुळे वाढत असलेल्या मानसिक तणावाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, तंत्रज्ञान आणि सुविधा वाढल्या असल्या तरी माणूस अधिक अस्थिर, चिडखोर आणि असंवेदनशील होत चालला आहे. घराघरात संवादाची कमतरता आणि समाजात वाढती बेफिकीरी ही चिंताजनक लक्षणे असून यामागील प्रमुख कारण म्हणजे मूल्यांचा अभाव आहे.
शिक्षकांनी केलेली कडक शिस्तही मुलांच्या भल्यासाठी असते, मात्र अनेक पालक ती चुकीच्या नजरेतून पाहतात, ही बाब समाजासाठी घातक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रमोद चौधरी यांनीही शिक्षण आणि सामाजिक भान यांची सांगड घालण्यावर भर दिला. ते म्हणाले की, समाजातील सकारात्मक परिवर्तनासाठी व्यक्तीची दृष्टी व्यापक असावी लागते आणि यासाठी कुटुंब, समाज आणि शिक्षणसंस्था तिन्ही स्तरांवर समन्वयाची गरज आहे. चौधरी यांनी अध्यात्म, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी यांना जीवनात केंद्रस्थानी ठेवण्याचा संदेश दिला.

पुरस्कार विजेत्यांची नावे

या कार्यक्रमात मोरया महाराज जीवन गौरव पुरस्कार प्रमोद चौधरी यांना प्रदान करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात अलौकिक कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पुरस्कार विजेत्यांमध्ये वेदमूर्ती मंदार शहरकर, मोरेश्वर पेंडसे, विनायक वाबळे आणि भाऊ खासनीस (मोरया महाराज पालखी वाहक), जीवन जोशी व प्रल्हाद जोशी (वेदशाळा), डॉ. मोहन भालचंद्र देव, अपर्णा धनंजय कुलकर्णी, चैतन्य बेणारे (Iron Man), श्रेया संदीप धाडगे (वायूसेना), गजलक्ष्मी ढोल ताशा पथक, गतीराम रघुनाथ भोईर, स्मिता मुकुंद सातव, तेजस्विनी साठे (कथक), निशा रसाळ, उमेश भगवान वाघेला (वन्यजीव अभ्यासक), यशवंत रंगनाथ देशपांडे, तानाजी श्यामराव शिंदे, ॲड. सुभाष गायकवाड, ॲड. हरिश्चंद्र सुरवसे आणि देवेंद्र सुर्वे यांचा समावेश होता.

यातील काही पुरस्कारार्थींनी मनोगत व्यक्त केले. विशेषत: तानाजी शिंदे यांनी धर्मजागृतीच्या वाटचालीतील दबाव, प्रलोभने आणि मन विषण्ण करणारे अनुभव सांगताना उपस्थितांना अंतर्मुख केले.

प्रास्ताविक ॲड. राजेंद्र उमाप यांनी केले तर स्वागत मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी केले. आभार प्रदर्शन विश्वस्त केशव विद्वांस यांनी केले. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.