राजकोट हादरल ७ वर्षांच्या चिमुरडीवर अमानुष अत्याचार; आरोपी अटकेत

0
2

दि.१० (पीसीबी) गुजरातमधील राजकोट जिल्ह्यात सात वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचाराने संपूर्ण परिसर हादरला आहे. 4 डिसेंबरला ही घटना घडली असून शेतात आई-वडिलांसोबत असताना 35 वर्षीय रामसिंग नावाच्या व्यक्तीने या बालिकेला फुस लावून एका निर्जन ठिकाणी नेलं. तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न अयशस्वी झाल्यावर रागाच्या भरात आरोपीने मुलीच्या गुप्तांगात एक फूट लांबीची लोखंडी सळई खुपसून तिच्यावर अत्याचार केला. या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली.

मुलगी अचानक बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच तिच्या आई-वडिलांनी शोध घेतला आणि काही वेळातच ती रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत सापडली. तातडीने तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर पुढील उपचारांसाठी राजकोट सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांच्या मते, सध्या बालिकेची अवस्था स्थिर आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मोठ्या प्रमाणात तपास सुरू केला. या प्रकरणासाठी 10 विशेष तपास पथकं तयार करण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, गुन्ह्याच्या वेळी त्या भागात सक्रिय असलेल्या मोबाईल फोनच्या लोकेशन डेटाचे विश्लेषण, तसेच साक्षीदारांची माहिती घेऊन पोलिसांनी तब्बल 140 संशयितांची यादी तयार केली. या सर्वांची पडताळणी केली गेली.

बाल समुपदेशक, महिला पोलीस अधिकारी आणि डॉक्टरांच्या उपस्थितीत पीडित मुलीला संशयितांचे फोटो दाखवण्यात आले. त्यापैकी एका व्यक्तीला मुलीने ओळखले आणि त्यानंतर पोलिसांनी रामसिंगला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, “अत्याचाराचा प्रयत्न फसल्याने रागाच्या भरात मुलीला सळईने जखमी केलं”, असं त्याने सांगितलं.

आरोपी रामसिंग हा मूळचा मध्य प्रदेशातील अलिराजपूर येथील असून गेली दोन वर्षे राजकोट ग्रामीण भागात शेतमजूर म्हणून काम करत होता. त्याला स्वतःला तीन मुले असून पीडित मुलीचं कुटुंबही रोजगारासाठी दाहोदहून येथे आलं होतं.

या प्रकरणी पोलिसांनी BNS कलम 65(2) तसेच POCSO कायद्याच्या विविध कठोर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या भयानक घटनेमुळे स्थानिक परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण पसरलं आहे.