हिंदू मंदिरांच्या जमिनी व परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करा — मंत्री नितेश राणे

0
11

चिंचवड “धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण हे पावित्र्यावर आघात असून दोन समाजांत तणाव निर्माण करण्याचे धोकादायक कारण ठरू शकते. हिंदू मंदिरांच्या जागांवर तसेच परिसरात झालेले अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही,” अशा स्पष्ट शब्दांत राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाला कठोर कारवाईचे निर्देश दिले.

श्रीमन महासाधू मोरया गोसावी महाराजांच्या 464 व्या संजीवन समाधी सोहळ्याचे उद्‍घाटन राणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीरंग बारणे होते. आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी महापौर अपर्णा डोके, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, सुरेश भोईर, अश्विनी चिंचवडे, राजेंद्र गावडे, नामदेव ढाके, शेखर चिंचवडे, राजाभाऊ गोलांडे, विश्वस्त जितेंद्र देव, ॲड. राजेंद्र उमाप, ॲड. देवराज डहाळे, केशव विद्वांस आदी मान्यवर उपस्थित होते.

राणे म्हणाले की, हिंदू समाजाने दाखवलेला विश्वास हेच आपल्या कार्याचे बळ आहे. धार्मिक स्थळांचे संरक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असून अतिक्रमणासारख्या गंभीर मुद्द्यांवर प्रशासनाने त्वरेने कार्यवाही करणे अत्यावश्यक आहे. “मोरया स्थानाच्या पावित्र्यात कोणतीही तडजोड होऊ देणार नाही. समाजातील शांतता, सद्भाव आणि धार्मिक समभाव अबाधित ठेवण्यासाठी पवित्र स्थळांचे व त्यांच्या जमिनींचे रक्षण अनिवार्य आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रसंगी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र देव यांनी सोहळ्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगत प्रास्ताविक केले. संजीवन समाधीची परंपरा, पवना नदीकाठी समाधीस्थळाची निवड यामागील आध्यात्मिक कारणे, तसेच सोहळ्यातील विविध धार्मिक उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. पवना नदी संवर्धनासाठी समाजाने संयुक्तपणे प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी मांडली.

आमदार शंकर जगताप यांनी चिंचवड देवस्थानच्या काही महत्त्वपूर्ण मागण्या शासनाकडे प्रलंबित असून त्याचा पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनीही धार्मिक स्थळांच्या संवर्धनात समाजाच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.

केशव विद्वांस यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.