पंडित कुमार गंधर्व यांचे नातू पंडित भुवनेशकुमार कोमकल्ली यांच्या सुरेल शास्त्रीय गायनाने तिसऱ्या दिवसाची सांगता

0
15

चिंचवड, दि. ९ – महासाधू मोरया गोसावी यांच्या संजीवन सोहळ्याच्या 464 व्या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी प्रसिध्द शास्त्रीय गायक आणि पंडित कुमार गंधर्व यांचे नातू पंडित भुवनेशकुमार कोमकल्ली यांनी आपल्या सुरेल शास्त्रीय गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या अवीट मैफिलीने तिसरा दिवस संस्मरणीय ठरला.

शास्त्रीय संगीताचा प्रेक्षकवर्ग निवडक असतो, त्यामुळे उपस्थितीबाबत काहीशी शंका होती. मात्र चिंचवडकर रसिक व मोरया भक्त वेळेवर मोठ्या संख्येने हजर राहिले आणि तब्बल दोन तासांच्या मैफिलीचा मनःपूर्वक आस्वाद घेतला.

पंडित कोमकल्ली यांनी राग यमनकल्याणाने मैफिलीची सुरुवात केली. ‘शिव शिव कल्याण करी’ या भजनात यमनकल्याणाची सुंदर गुंफण करून त्यांनी पहिल्याच क्षणी श्रोत्यांची मनं जिंकली. त्यानंतर ‘सुंदर ते ध्यान’ हा अभंग त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत सादर करत त्यांनी आपल्या समृद्ध अभ्यासाची आणि गायनपरंपरेची झलक दाखवली.

यानंतर कबीर, मीरा आणि निर्गुण परंपरेतील भावपूर्ण भजने— ‘मुरशिद नैनो बीच’, ‘भज ले रे मना’, ‘निर्भय निर्गुण’, ‘सुनता है गुरु ज्ञानी’, ‘युगन युगन हम योगी’, ‘शून्य गढ़ शहर’—यांच्या सादरीकरणाने सभागृह भावविभोर झाले.

मैफिलीत साथसंगत करणारे कलाकार :

  • पेटीवादन : उमेश पुरोहित
  • तबला : प्रशांत पांडव
  • पखवाज : विनोद तिकोनकर
  • सहगायिका : वर्षा बन्सीवाल
  • तालवाद्य / टाळ : धनंजय शाळीग्राम

कार्यक्रमादरम्यान कलाकारांचा सन्मान विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वान्स, ऍड. देवराज डहाळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पिंपरी चिंचवड देवस्थानचे विश्वस्त व कार्यकर्ते — सत्यजित मुंगी, स्वप्नील देव, वरद देव, धनंजय शाळीग्राम, स्वानंद मोकाशी, केदार बावळे — यांच्या हस्ते कलाकारांचा सन्मान करणे हा एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. कार्यकर्त्यांच्या निष्ठावान श्रमांचे कौतुक करण्याचा हा उपक्रम उपस्थितांना विशेष भावला.

या कार्यकर्त्यांनी विनम्रतेने व्यासपीठावर येण्यास नकार दर्शवला होता; मात्र विश्वस्त मंडळींचा आग्रह मानून ते मंचावर आले. नम्रता आणि सेवाभावाची ही झलक पाहून सर्वांच्या मनाला स्पर्श करणारा हा प्रसंग ठरला.

शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताची ताकद म्हणजे अजाण श्रोत्यांनाही ते सहज भिडते—ही अनुभूती या अभंगवाणीने पुन्हा अधोरेखित केली. तिसऱ्या दिवसाची ही संगीतमय रजनी महोत्सवातील एक स्मरणीय पर्व ठरली.