दि.०८(पीसीबी)-पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज वितरण करण्याची प्रक्रिया करण्यात आली. आज शेवटच्या दिशवी 650 हून अधिक इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत. विशेष म्हणजे, पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनीसुद्धा पक्षाच्या शिष्टाचाराप्रमाणे (प्रोटोकॉल) स्वत: इच्छुक असल्याचा अर्ज घेतला आहे. ‘राष्ट्र प्रथम…नंतर पार्टी अन् शेवटी स्वत:’’ हा पक्षाचे धोरण आपल्या कृतीमधून अधोरेखित केले आहे.
महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना झाली. त्यानंतर आरक्षण सोडत झाली. भाजपा नेते तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच शहरात आढावा बैठक घेतली. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कोअर कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. पक्षश्रेष्ठींच्या सूचनेप्रमाणे, निवडणुकीसाठी इच्छुकांनी अर्ज घ्यावेत आणि अचूक भरुन पार्टी कार्यालयात निर्धारित वेळेत जमा करावेत. सदर अर्जांची पडताळणीकरुन प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात येतील. याबाबत शहराध्यक्षांनी कार्यवाही करावी, अशा सूचना केल्या होत्या.
दरम्यान, भाजपाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. शहरातील एकूण 128 जागांवर निवडणूक होत आहे. मात्र, मोरवाडी, पिंपरी येथील जनसंपर्क कार्यालयातून आतापर्यंत 650 हून अधिक इच्छुकांनी अर्ज घेतले आहे. दुसरीकडे, काही इच्छुकांनी अद्याप पक्ष शिष्टाचाराप्रमाणे इच्छुक उमेदवारीबाबत अर्ज घेतलेले नाहीत. त्यांनी निर्धारित वेळेत अर्ज घ्यावेत, असे आवाहन संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांनी केले आहे.
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आपला बालेकिल्ला महानगरपालिका प्रभाग क्रमांक 28 म्हणजे फाईव्ह गार्डन, शिवार गॉर्डन, प्लॅनेट मिलेनीयम, कापसे लॉन, रामनगर, पिंपळे सौदागर, कुणाल आयकॉन, रोझ आयकॉन, गोविंद गार्डन या भागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी अवघ्या 6 महिन्यांत शहरात 200 हून अधिक कार्यक्रम व उपक्रम घेतले आहेत. कार्यकर्त्यांचे ‘‘प्रभावी संघटन, जनसेवा, पक्षनिष्ठा आणि शेवटच्या घटकांचा विकास’’ या चार सूत्रांवर काम सुरू आहे. कार्यकारिणी निवडताना त्यांनी शहर पातळीवर काम करू इच्छिणाऱ्या तीनशेपेक्षा अधिक कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या व त्यामधून आपल्या ‘टीम’ची बांधणी केली. यांची पक्ष पातळीवर राज्य स्तरावर नोंद घेतली होती.
भाजपा शिस्तप्रिय पक्ष आहे. निवडणूक असो किंवा संघटन पक्ष शिष्टाचार हा शिरोभागी असतो. मी प्रभाग 28 मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यप्रणालीनुसार इच्छुक उमेदवारी अर्ज घेतला. बहुतांशी इच्छुकांनी अर्ज घेतलेले आहेत. उर्वरित उमेदवारांनीसुद्ध अर्ज घ्यावेत आणि पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या निर्धारित मुदतीमध्ये जमा करावेत. त्याची पडताळणी करुन ते प्रदेश कार्यालयाकडे सादर करण्यात येतील. ऐनवेळी आलेल्या अर्जांचा विचार होणार नाही. त्यानंतर पक्षाचे गोपनीय सर्व्हे, निवडून येण्याची क्षमता आणि पक्ष कार्यातील सक्रियता याच्या आधारे पक्षश्रेष्ठी उमेदवारी निश्चित करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवड महापालिकेवर ‘कमळ’ फुलेल, असा विश्वास आहे, असा विश्वास शहराध्यक्ष काटे यांनी व्यक्त केला.











































