दि.८(पीसीबी) – राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असून, लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) पिंपरी-चिंचवड शहरात जोरदार तयारी करत आहे. नुकतीच प्रदेश पातळीवरून कोअर कमिटीची घोषणा झाल्यानंतर, आज पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी शहरातील महिला संघटनेचा आढावा घेतला आणि आगामी निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणी कशी असावी, याबद्दल महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
महिला आघाडीच्या बैठकीत बोलताना रोहिणी खडसे यांनी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण आवाहन केले. त्या म्हणाल्या की, “शरद पवार साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण मिळवून दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी या आरक्षणाचा लाभ घेऊन संधीचे सोने केले पाहिजे.” राजकारणात सुरुवातीला महिला पदाधिकाऱ्यांना अडचणी येतातच, मात्र या सगळ्यांवर मात करत त्यांनी काम करत राहिले पाहिजे. महिलांनी घराचा उंबरा ओलांडून समाजकार्यासाठी बाहेर पडायला हवे आणि कामातील सातत्य हाच राजकीय यशाचा मूलमंत्र आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, आपल्या सोबत आणि विरोधात कोण निवडणूक लढणार आहे, याचा विचार न करता पक्षातील महिलांनी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली पाहिजे. त्यातून आपले राजकीय आणि सामाजिक स्थान बळकट होणार आहे. शहर महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर यांनी यावेळी माहिती दिली की, प्रत्येक प्रभागातून महिलांनी उमेदवारी अर्ज आमच्याकडे केले आहेत आणि लवकरच हे सर्व अर्ज कोअर कमिटी समोर सादर केले जातील. यावेळी उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी शहरातील अनियमित पाणीपुरवठा, महिला स्वच्छतागृह, महिला सुरक्षितता इत्यादी महिलांच्या संदर्भातील अनेक अडचणी प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यासमोर मांडल्या. या बैठकीला शहर कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, प्रदेश संघटक सचिव संदीप चव्हाण, चिंचवड विधानसभा अध्यक्ष सोनल पासलकर, भोसरी विधानसभा सारिका हरगुडे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष कल्पना घाडगे, माजी नगरसेविका प्रियांका बारसे, विद्यार्थी शहराध्यक्ष राहुल आहेर, सामाजिक न्याय शहराध्यक्ष मयुर जाधव, प्रवक्ते माधव पाटील, अरुण पवार, चिंचवड कार्याध्यक्ष सुवर्ण वाळके, पिंपरी कार्याध्यक्ष बबिता बनसोडे, प्रफुल्ला मोतीलिंग यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










































