दि.०८(पीसीबी)-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र 2047’ संदर्भात आढावा बैठक पार पडली.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सार्वजनिक विद्यापीठांनी उच्च शिक्षणातील शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, पायाभूत सुविधा आणि विद्यापीठ रँकिंग याबाबत सध्याची स्थिती लक्षात घेऊन त्याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यापीठांचे रँकिंग उंचावण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्याचे कालबद्ध नियोजन करावे. या कृती आराखड्याला अधिक गती देण्यासाठी ऑनलाईन डॅशबोर्ड विकसित करावा; यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल.
राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रँकिंग सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, यासाठी प्रत्येक विद्यापीठाच्या डिजिटल मॉनिटरिंगसाठी डॅशबोर्ड तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
जागतिक स्पर्धेच्या युगात शैक्षणिक गुणवत्ता उंचावून कुशल मनुष्यबळ तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रोजगार निर्मितीसाठी उद्योग क्षेत्राशी करार, इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप, कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम यांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी विद्यापीठांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. खासगी विद्यापीठे वेगाने पुढे येत असल्याने सार्वजनिक विद्यापीठांनी गुणवत्तेकडे अधिक लक्ष द्यावे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
बैठकीत खालील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली :
✅ NIRF रँकिंगमध्ये सार्वजनिक विद्यापीठांची क्रमवारी उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न करणे
✅ महाराष्ट्राला जागतिक शिक्षणाचे गंतव्यस्थान बनवणे : राज्याबाहेर जाणारे विद्यार्थी रोखणे आणि NRI तसेच परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करणे
✅ उच्च-TRL (Technology Readiness Level) संशोधनाला प्रोत्साहन देऊन व्यावसायिकदृष्ट्या मौल्यवान पेटंट्स निर्माण करणे
✅महाविद्यालयांमधील शिक्षणाची पातळी उंचावणे आणि विद्यार्थ्यांना जागतिक रोजगारासाठी तयार करणे
✅अभ्यासक्रमांना भविष्यातील रोजगार बाजारातील कौशल्ये व ज्ञानाच्या मागण्यांशी संरेखित करणे
✅जागतिक विद्यापीठांशी सहयोगासाठी विद्यापीठांच्या साधनसंपत्तीचा उपयोग करणे
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.











































