ईव्हीएमवर अविश्वास? शिंदे गटाच्या आमदाराकडून स्ट्राँग रूमला खासगी सुरक्षा

0
17


दि.०७(पीसीबी)-भाजपकडून ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाण्याची शक्यता असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी शिंदे गटाच्या आमदाराला प्रशासन-पोलिसांवर भरोसा नसल्याचं चित्र आहे. कारण शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी भडगाव आणि पाचोरा या ठिकाणाच्या स्ट्राँग रुमला स्वतःची खासगी सुरक्षा व्यवस्था तैनात केल्याचं दिसून आलं आहे. यामुळे मात्र जिल्ह्यात राजकीय चर्चा जोरात रंगली आहे.नुकतेच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत पाचोरा आणि भडगाव या दोनही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाविरुद्ध भाजप असा जोरदार सामना रंगला आहे. मतदान ईव्हीएममध्ये बंद झाल्यानंतर आता ईव्हीएम स्ट्राँग रुममध्ये बंदिस्त असून २१ डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे.

जळगावच्या एरंडोल येथे स्ट्राँग रूमच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचा डिस्प्ले अडीच तासापर्यंत बंद पडल्याचा प्रकार समोर आला. या प्रकाराबाबत एरंडोल नगरपरिषद निवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी आक्षेप तसेच शंका उपस्थित करत निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदारांकडे लेखी तक्रार केली आहे. तर जळगावच्या धरणगावमध्ये विरोधी पक्षाचे कार्यकर्ते स्वतःच स्ट्राँग रूमच्या बाहेर पहारा देताना दिसत आहेत. राज्यभर कमी अधिक प्रमाणात हिच परिस्थिती दिसत आहे.

जळगाव जिल्ह्यातील भडगाव आणि पाचोरा येथील ईव्हीएम स्ट्राँग रूमच्या सुरक्षेला अनपेक्षित वळण मिळाल्याचं दिसतंय. या दोन्ही ठिकाणी सरकारी सुरक्षा यंत्रणेसह गणवेशधारी खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी आपल्या उमेदवारांच्या आग्रहास्तव हे खासगी सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत.दोन्ही शहरांमध्ये नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात जोरदार सामना रंगलेला असताना खासगी सुरक्षा रक्षकांची तैनात आता राजकीय चर्चेचा मुख्य मुद्दा ठरत आहे. अधिकृत चोख पोलिस बंदोबस्त असतानाही सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने स्वतंत्र सुरक्षा रक्षक नेमल्याने ईव्हीएम सुरक्षिततेबाबत नवीन प्रश्न उपस्थित झाले आहेत.स्ट्राँग रुम बाहेर नेमलेले सुरक्षारक्षक इथल्या परिसरावर करडी नजर ठेवत आहेत. एकंदरीत या सर्व घडामोडींमुळे निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता मात्र वाढली आहे.