तालेरा रुग्णालयातील दुर्लक्षामुळे नवजात शिशूचा मृत्यू

0
7

संभाजी ब्रिगेडचा संताप, वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

पिंपरी , दि . ६

पिंपरी–चिंचवड शहरातील तालेरा रुग्णालयात प्रसूतीपूर्वी नवजात शिशूचा मृत्यू झाल्याच्या गंभीर घटनेवरून संभाजी ब्रिगेडने वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, तालेरा रुग्णालयाविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे, कार्याध्यक्ष विशाल मिठे यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संभाजी ब्रिगेडने दिलेल्या निवेदनात नमूद केले की, गर्भवती महिलेला वेदना सुरू झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला दुर्लक्षित करत “अजून वेळ आहे” असे सांगत तातडीची उपचार प्रक्रिया न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अचानक स्थिती गंभीर झाल्यानंतर डॉक्टरांनी हस्तक्षेप केला. पण तोपर्यंत उशीर झाल्याने नवजात शिशूचा मृत्यू झाला. या घटनेला रुग्णालयातील उशीर, निष्काळजीपणा आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची गरज असल्याचे संभाजी ब्रिगेडने नमूद केले आहे.
महापालिकेने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून तालेरा रुग्णालयातील संबंधित वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याला तात्काळ पदावरून दूर करण्याची मागणी करत महापालिका प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली. अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेने दिला.