पुणे विमानतळावर इंडिगोचा कारभार ठप्प; क्रू संकटामुळे १६ उड्डाणे रद्द, प्रवासी संतप्त

0
1

दि.०५ (पीसीबी)-पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो एअरलाईन्सचा नियोजनशून्य कारभार अक्षरशः कोलमडल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. सलग दुसऱ्या दिवशीही विमानांचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले असून, प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या दोन दिवसांत इंडिगोची १६ पेक्षा अधिक उड्डाणे रद्द झाली आहेत, तर १९ हून अधिक फ्लाइट्स मोठ्या विलंबाने धावपट्टीवरून उड्डाण घेत आहेत.

या गोंधळाचे मुळ कारण विमानतळाची अल्प क्षमता नसून इंडिगोच्या अंतर्गत व्यवस्थापनातील गंभीर त्रुटी आणि पायलट–क्रू कर्मचाऱ्यांची प्रचंड कमतरता असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पुणे विमानतळावर केवळ दहा विमानांसाठी पार्किंग क्षमता उपलब्ध आहे; मात्र क्रू उपलब्ध न झाल्याने इंडिगोची नऊ विमाने तासनतास पार्किंग बेमध्ये उभी राहिली.

विमानतळ संचालक संतोष धोके यांनी सांगितले की, इंडिगोच्या विमानांना चालक दल उपलब्ध होण्यासाठी मोठा वेळ लागत आहे, त्यामुळे पार्किंग बे दीर्घकाळ व्यापून राहतात. यामुळे इतर एअरलाईन्सच्या विमानांच्या लँडिंग व टेकऑफवरही परिणाम होतो. जागा उपलब्ध नसल्याने काही विमानांना मुंबईला वळवण्याची वेळ विमानतळ प्रशासनावर आली.

या गोंधळाचा परिणाम सकाळच्या नागपूर इंडिगो फ्लाइटवरही झाला. फ्लाइट वेळेवर न सुटल्याने प्रवाशांची मोठी निराशा झाली. तिकिटे रद्द करण्यासाठी, वेळापत्रकाविषयी माहिती मिळवण्यासाठी आणि पर्यायी फ्लाइटची मागणी करण्यासाठी विमानतळावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. अनेकांना त्यांचा प्रवास ठरलेल्या वेळेपेक्षा कित्येक तास उशिरा सुरू करावा लागला, तर काहींची तिकिटे थेट रद्द झाली. जोधपूरला लग्नासाठी जाणाऱ्या प्रवाशांनी “इंडिगोने आमचे संपूर्ण नियोजन विस्कळीत केले” अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, या गोंधळावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली आहे. इंडिगोची व्यवस्थापनशैली ही सरकारच्या मक्तेदारी मॉडेलचा परिणाम असल्याची टीका करत त्यांनी म्हटले की, “विलंब, रद्द उड्डाणे आणि याचे बळी सामान्य नागरिक ठरत आहेत. देशाला निष्पक्ष स्पर्धेची गरज आहे, मक्तेदारीची नाही.”पुणे विमानतळावरील इंडिगोच्या अव्यवस्थित कारभारामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे प्रवाशांमध्ये रोष निर्माण झाला आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी प्रवाशांची जोरदार मागणी आहे.