- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
- महानगरपालिका निवडणुकीसाठी पिंपळे-सौदागर येथे महत्वपूर्ण बैठक
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना अपेक्षित विकासकामांसाठी किंवा सुधारणांसाठी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधा आणि योग्य सूचना संकलित करून लोककेंद्रीत जाहीरनामा तयार करा. भाजपा सत्ताकाळात केलेली विकासकामे आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प घराघरात पोहोचतील, असे नियोजन करा, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व लोकप्रतिनिधी, माजी खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी यांची राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतपाटील यांनी आढावा बैठक घेतली.
यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस विकास डोळस, मधुकर बच्चे, वैशाली खाडे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, दक्षिण भारतीय आघाडीचे प्रदेश संयोजक राजेश पिल्ले, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी महापौर नितीन काळजे, माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, युवा मोर्चा शहराध्यक्ष दिनेश यादव, महिला शहराध्यक्ष सुजाता पालांडे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष चेतन भुजबळ, अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष अनिल घोलप, मंडलाध्यक्ष गणेश ढोरे, शिवराज लांडगे, मंगेश धाडगे, जयदीप खापरे, धरम वाघमारे, अजित बुर्डे, रामदास कुटे, अमोल डोळस, सोमनाथ तापकीर, मोहन राऊत, हर्षद नढे, अनिता वाळुंजकर पदाधिकारी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांनी बैठकी दरम्यान शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना निवडणूक इच्छुकांसाठी अर्ज वितरणाची कार्यवाही सुरू करण्यास सांगितले. त्यांनी निर्देश दिले की, आगामी ५ दिवसांत इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरुन घेणे आवश्यक आहे आणि सदरचे अर्ज पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून वितरीत केले जावेत. अर्जांचा स्वीकार स्वतः शहराध्यक्ष करणार आहेत. त्याचबरोबर, प्रत्येक प्रभागनिहाय किमान ५ हजार घरांमध्ये पक्षाचा जाहीरनामा पोहोचवणे आणि संपूर्ण शहरातील किमान ५० हजार नागरिकांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन भाजपच्या सत्ताकाळात झालेल्या विकासकामांची तसेच राज्य व केंद्र सरकारच्या प्रकल्पांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील ३२ प्रभागांमध्ये प्रभागनिहाय बैठका घेण्यात येणार आहेत. या बैठका उमेदवारांची क्षमता तपासण्यासाठी तसेच बूथ रचना, शक्तीकेंद्र रचना आणि कार्यप्रणाली यांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केल्या जातील, अशी भूमिका शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी मांडली.
“आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रत्येक प्रभागातील नागरिकांपर्यंत भाजपच्या विकासकामांची माहिती पोहोचवणे आणि नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेणे ही आमची प्राथमिकता आहे. यासाठी अर्ज, प्रभागनिहाय बैठक आणि जनसंपर्क या सर्व गोष्टी वेळेत आणि प्रभावी पद्धतीने राबवल्या पाहिजेत, अशा सूचना पदाधिकारी, पक्षाचे लोकप्रतिनिधी यांना दिल्या आहेत.
– चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री.
——-
“महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रत्येक प्रभागात बैठक घेऊन उमेदवारांची क्षमता तपासणार आहोत. यामध्ये बूथ रचना, शक्तीकेंद्र रचना आणि कार्यप्रणाली यांचा सखोल आढावा घेण्यात येईल. शहरातील ३२ प्रभागांमध्ये बैठकांचे नियोजन आहे. ‘‘अबकी बार 100 पार’’ असा आमचा निर्धार आहे.
– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.
















































