दि.०४(पीसीबी)- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचनांचा पाऊस पडला आहे. बुधवारी शेवटच्या दिवशी तीन हजार २१६ हरकती दाखल झाल्या आहेत. एकूण दहा हजार २८८ हरकती आल्या आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी विधानसभेच्या मतदार याद्या वापरण्यात येत आहेत. एक जुलै २०२५ पर्यंतची मतदार संख्या गृहित धरण्यात आली आहे. त्यानुसार प्रारूप याद्या प्रसिद्ध केल्या. शहरात चार विधानसभा मतदार संघ येत असून यामध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक सहा लाख ७६ हजार ६३८, भोसरीत सहा लाख २४ हजार १५२, पिंपरीत तीन लाख ९९ हजार ८११ आणि भोर विधानसभा मतदारसंघातील ताथवडेगावात १३ हजार २९० असे १७ लाख १३ हजार ८९१ मतदार आहेत. त्यानुसार एक ते ३२ प्रभागांची प्रारूप मतदार यादी २० नोव्हेंबरला प्रसिद्ध करून २७ नाेव्हेंबरपर्यंत हरकती घेण्याची मुभा दिली हाेती. त्यानंतर हरकती घेण्यास तीन डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली होती. या मुदतीमध्ये आठ क्षेत्रीय कार्यालय व मतदार यादी कक्षाकडे दहा हजार २८८ हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. महापालिकेने स्वतःहून (सुमोटो) २७५ हरकती दाखल करून घेतल्या आहेत. दुबार नावाबाबत २३ तक्रारी आल्या आहेत.
क्षेत्रीय कार्यालयानुसार आलेल्या हरकती
क्षेत्रीय कार्यालय – हरकतींची संख्या
अ – ८१८
ब – १३०६
क – २४६१
ड – १४८०
इ – ४३०
फ – १६६८
ग – १३४५
ह – ७८०
मतदार यादी कक्ष – १४३
२०१७ पेक्षा अधिक हरकती
महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर फक्त ७२२ हरकती आल्या होत्या. यावेळी तब्बल दहा हजार २८८ हरकती आल्या आहेत.
प्रभागनिहाय मतदार यादी विभाजीत केल्यानंतर त्यात ९२ हजार ६६४ दुबार मतदार आढळून आले हाेते. समान नावे असलेल्या या मतदारांची पडताळणी केली जाणार आहे. ती एकच व्यक्ती आहे की भिन्न हे तपासले जाणार आहे. एकच व्यक्ती असल्यास दुबार मतदार म्हणून त्या मतदारांच्या नावापुढे दोन स्टार छापले जाणार आहे. त्यामुळे त्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येईल. त्यासाठी त्यांच्याकडून हमीपत्र घेतले जाणार आहे. हरकती व सूचनावर सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुबार मतदारांचे चित्र अधिक स्पष्ट होईल.
हरकतीवर सुनावणीसाठी आठ उपायुक्त, आठ क्षेत्रीय अधिकारी यांच्यासह आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हरकती येताच त्यावर सुनावणी घेण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे ५० टक्क्यांपेक्षा जास्त हरकतींवर सुनावणी पूर्ण झाली आहे. दहा तारखेपर्यंत हरकतींवर निर्णय घेऊन अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.













































