दि.०२(पीसीबी)-आगामी पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपने आपला पक्ष बळकट करण्यासाठी इतर पक्षातील नेत्यांना मोठ्या प्रमाणात जोडून घेण्याची मोहीम सुरू केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांना आगामी दिवसांत भाजप मोठा राजकीय धक्का देणार असल्याची चर्चा आहे. या पक्षांतील वीसहून अधिक माजी नगरसेवक भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत असून त्यातील निम्म्या नगरसेवकांना वरिष्ठ पातळीवरून हिरवा कंदील मिळाल्याची माहिती आहे. महापालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच हा प्रवेश होणार आहे.
महापालिका निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्षांनी गतिमान सुरुवात केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने एकत्र लढायचे की नाही, याबाबत अद्याप निश्चितता नाही. २०१७ मध्ये १०० नगरसेवकांसह स्वतंत्र सत्ता मिळवणाऱ्या भाजपमध्ये यंदाही प्रत्येक प्रभागात अनेक इच्छुक रांगेत आहेत. ज्या प्रभागात भाजप तुलनेने कमजोर आहे, तेथे इतर पक्षांतील नेत्यांना जोडले जात आहे. शिवसेना (ठाकरे गट) येथील पाच माजी नगरसेवक नुकतेच भाजपात दाखल झाले. त्यानंतरही अनेक ज्येष्ठ नेते प्रवेशासाठी इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्याच्या राजकीय परिस्थितीत भाजपच्या तिकिटासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एका प्रभागात पाच ते दहा जण इच्छुक असल्याने स्पर्धा तीव्र झाली आहे. इतर पक्षातून भाजपात प्रवेश करून निवडणूक लढवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचीही संख्या लक्षणीय आहे. शहरातील विविध पक्षांतील किमान २१ माजी नगरसेवक भाजपात दाखल होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह काँग्रेस आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक सामील असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दशरामध्येच काही माजी नगरसेवकांचा प्रवेश होणार होता; मात्र काही भाजप नेत्यांच्या विरोधामुळे तो पुढे ढकलावा लागला. दिवाळीतही प्रवेश न झाल्याने आता निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मोठा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात आगामी दिवसांत मोठे राजकीय उलथापालथ पाहायला मिळू शकते.
शिवसेनेतील फूट आणि बदललेली राजकीय समीकरणे लक्षात घेता भाजपने महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला असून, महायुतीचा घटक असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी भाजपची थेट लढत होणार असल्याचे संकेत आहेत. २०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ३९ नगरसेवक निवडून आले होते. फुटीनंतर बहुतांश नगरसेवक अजित पवार यांच्यासोबत राहिले आहेत. त्यांच्यातील काही जण भाजपसोबत युती करून लढण्याच्या बाजूने असले तरी भाजपने स्वबळावरची तयारी सुरू केल्याने ते संभ्रमात असल्याचे म्हटले जाते.










































